संग्रहित फोटो
पुणे : हडपसर आणि खडकी या दोन वेगवेगळ्या कारवाई करून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ तस्कराना पकडले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७ लाख ८८ हजार रुपयांचा अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ/दोडाचुरा) आणि २१ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी हडपसर आणि खडकी पोलिसांत दोन स्वंतत्र गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
ही कारवाई उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड व त्यांच्या पथकाने केली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी, कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मांजरी रोड चौकाजवळील इंद्रप्रस्थ कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर दोघेजण अफूच्या बोंडांचा चुरा बाळगून असल्याची माहिती अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना मिळाली. त्यानूसार राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१) आणि ताराचंद सिताराम जहांगिर (वय २६, दोघे. रा. उरळी कांचन, मूळ रा. राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३ किलो ५६० ग्रॅम अफूचा बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) तसेच इतर मुद्देमाल मिळून एकूण २ लाख १५ हजारांचा माल जप्त करण्यात आला.
तर, त्याच रात्री दुसर्या कारवाईत खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीनूसार भागवत शिवाजी मंडलीक (वय २६, रा. रहाटणी), मुसीम सलीम शेख (वय २४, रा. बीड) आणि महेश नारायण कळसे (वय २४, रा. बीड) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २१ किलो ८६० ग्रॅम गांजा आणि इतर साहित्यासह एकूण ५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे सुद्धा वाचा : पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा खून, हाताची बोटेही तोडली; कारण…
मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या
मुंबईहून पुण्यात आलेल्या एकाकडून पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. त्याच्याकडून २ ग्रॅम एमडी, मोबाइल, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी परिसरातील एका पानपट्टीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची मााहिती पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले.