संग्रहित फोटो
पिंपरी : एक बांगलादेशी महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात आली. मात्र, तेथील महिला पोलिस कर्मचार्याला संशय आल्याने त्यांनी याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती दिली आणि दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या चौकशीत ती महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. महिला पोलिसाच्या सतर्कतेमुळे बांगलादेशी घुसखोर महिलेला जेरबंद करण्यात आले आहे.
शहनाज हलीम चौधरी उर्फ शिला मोहमद कुद्दुसमीया अखतर (वय २९, सध्या रा. श्रीजी कॉम्प्लेक्ससमोर, नेहरूनगर, पिंपरी, मुळ – बांगलादेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार पुंडलिक पाटील यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेने हिंदुस्थानी पासपोर्ट मिळवला होता. दरवर्षी पासपोर्टसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. या दरम्यान पिंपरी पोलीस ठाण्यातील हवालदार रेश्मा गायकवाड यांनी या महिलेच्या पासपोर्टवरील माहिती संशयास्पद वाटल्याने त्याची सखोल चौकशी करण्यासाठी एटीएसला माहिती दिली.
उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि पोलीस निरीक्षक विकास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. संशय वाढल्याने पोलिसांनी महिलेला पिंपरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान तिने भारतीय आधारकार्ड २४ नोव्हेंबर २०१८ रोजी घेतल्याचे आढळले. तसेच, ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमधून जन्म प्रमाणपत्र मिळवले होते. मात्र, जेव्हा पोलिसांनी तिला हिंदुस्थानविषयी साधे प्रश्न विचारले, तेव्हा ती योग्य उत्तर देऊ शकली नाही.
बांगलादेशी पासपोर्ट केला नष्ट
पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता त्यात अनेक बांगलादेशी क्रमांक आढळले. तसेच, ती सोशल मीडिया आणि फोनद्वारे बांगलादेशातील लोकांशी संपर्कात असल्याचे दिसून आले. पुढील तपासात तिचे जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचेही स्पष्ट झाले. तिच्या मोबाईलमध्ये हिंदुस्थानी मतदान कार्ड, पश्चिम बंगालमधील शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर कागदपत्रांच्या प्रती आढळल्या. तसेच, तिच्या ताब्यात हिंदुस्थानी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि भारतीय पासपोर्ट देखील सापडला. विशेष म्हणजे, तिच्या मोबाईलमध्ये तिचा बांगलादेशी ओळखपत्र आणि पासपोर्टच्या प्रतीदेखील सापडल्या. संबंधित महिला २०१८ मध्ये एजंट महिलेच्या मदतीने बांगलादेशातून हिंदुस्थानात आली. हिंदुस्थानात आल्यानंतर तिने तिचा बांगलादेशी पासपोर्ट नष्ट केला आणि २०१९ मध्ये तिचा व्हिसा कालबाह्य झाल्यावर तो नुतनीकरण केला नाही. त्याऐवजी, तिने हिंदुस्थानात बनावट कागदपत्रांच्या आधारे नवीन भारतीय ओळख तयार केली आणि शहनाज नावाने भारतीय पासपोर्टही मिळवला.
हिंदुस्थानी व्यक्तीशी लग्न ते रिल्स स्टार
हिंदुस्थानात आल्यानंतर पश्चिम बंगालमधून ती सुरुवातीला पुण्यात आली. तेथे काही दिवस राहिल्यानंतर ती नाशिकला गेली आणि २०२२ मध्ये भोसरी, पिंपरी-चिंचवड येथे राहू लागली. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिने एका हिंदुस्थानी व्यक्तीसोबत विवाह केला आणि पिंपरीतील नेहरूनगर येथे पतीसमवेत गृहिणी म्हणून राहत होती. तिने फेसबुकवर रील स्टार अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. सध्या तिची सहा ते सात फेसबुक अकाउंट असून, त्यावरून तिने अनेक फॉलोअर्स जोडले आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी – चिंचवड बरोबरीनेच देशासह बांगलादेशातील काही फॉलोअर्सचा समावेश आहे. पोलिसांनी या सगळ्यांचा देखील सोशल तपास सुरू केला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे फौजदार नाथा केकाण अधिक तपास करीत आहेत.