सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : प्रवासानिमित्ताने स्वारगेट बसस्थानकात आल्यानंतर गर्दीत प्रवाशांकडील सोन्या – चांदीचे दागिने चोरणार्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे ६ तोळे दागिने जप्त करण्यात आले असून, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांना यामुळे काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.
दुर्गा अविनाश उपाध्याय (३०, रा. खडकी, मूळ. रा. गुलबर्गा, कर्नाटक), लक्ष्मी भिवा सकट (२५, रा. खडकी, मूळ. रा, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
शहरातील स्वारगेट भागात एसटी स्टॅण्डसह पीएमपीएलची स्थानके आहेत. त्यामुळे प्रवासानिमित्ताने या भागात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शहर परिसरात जाणार्या पीएमपीएल बसेस खचाखच भरून जातात. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे प्रवाशांकडील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारतात. मागील काही दिवसांत सातत्याने स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरी गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलिसांकडील दामिनी पथक याठिकाणी गस्त घालत होते.
कात्रज पीएमपीएल बसस्थानक येथे दोन महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती महिला पोलीस अंमलदार अनिता धायतडक यांना मिळाली. त्यानूसार स्वारगेट पोलिसांच्या पथकाने महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी स्टॅंड भागात चोरी केल्याची माहिती दिली. तपासात पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ८८ हजारांचे ६ तोळे दागिने जप्त केले. तर, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.