संग्रहित फोटो
पुणे : मोदी गणपती शेजारी तसेच महापालिकेच्या वाहनतळाच्या परिसरात सुरु असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात सहायक पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला असून, त्यासोबतच प्रविण बोदवडे, विजय महाडिकसह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जुगार खेळणाऱ्या सहाय्यक फौजदार यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश भुजबळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन प्रविण काशिनाथ बोदवडे (वय ४४, रा. कात्रज) याच्यासह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा जुगार अड्डा विजय महाडिक चालवत असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केल्याचे समजते. महेश महादेव भुतकर असे निलंबित केलेल्या सहायक पोलीस फौजदाराचे नाव आहे. ते सध्या मुख्यालयातील सी कंपनीत नेमणुकीला होते. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.
३३ जणांना घेतले ताब्यात
पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे वारंवार सूचना देत आहेत. पण, छुप्या पद्धतीने जुगार अड्डे सुरूच असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, विश्रामबाग पोलिसांना नारायण पेठेतील मोदी गणपती शेजारील हरिभाऊ साने वाहनतळाच्या परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. तेथे जुगार खेळणार्या ३३ जणांना ताब्यात घेतले. त्यात पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस फौजदारही जुगार खेळत असल्याचे आढळून आले. वाहनतळाच्या टेरेसवरील खोलीत हा जुगार खेळला जात होता. खेळातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा माल जप्त करण्यात आला.
इचलकरंजी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा
गेल्या काही दिवसाखाली कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत बेकायदेशीरपणे विनपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेऊन राेख रक्कम, माेबाईल व माेटरसायकली व इतर साहित्य असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिस काॅन्स्टेबल सुनिल दत्तात्रय बाईत यांनी फिर्याद दिली आहे. कबनूर येथील परीट गल्लीत राहणाऱ्या रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत तीनपानी जुगार सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी रात्रीच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.