संग्रहित फोटो
पुणे : कात्रजजवळील गुजर निंबाळकरवाडी परिसरात पोलिस तसेच स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. जवळपास १५ हून अधिक जणांवर विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सहभागी झालेले बैलगाडा मालकांचा देखील समावेश आहे.
याप्रकरणी पोलिस अंमलदार सचिन पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आदित्य सणस, वृषभ भालचंद्र धावडे, हेमंत मुकुंद बेंद्रे, रोहित भारत रणमळे, आदित्य मोहन शिंदे, ओमकार इंगवले, दिगंबर होळवले, प्रथमेश गातळे, अनिकेत बगडे, सादिक शिंदे, सुरज मुंडे, विक्रम पवार आणि इतर आयोजक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२३, २२३, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११२ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी या भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा पोलिसांची किंवा स्थानिक प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच, याठिकाणी बैलगाडा शर्यत भरविली गेली. शर्यतीचे आयोजन डोंगरालगत असलेल्या एका मोकळ्या जागेत करण्यात आले होते. शर्यतीदरम्यान घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी, ॲम्ब्युलन्स तसेच बॅरिकेटिंगसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हती, ज्यामुळे प्रेक्षकांच्या तसेच सहभागींच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी शर्यत थांबवण्याच्या सूचना दिल्यानंतर देखील आयोजकांनी त्या दुर्लक्षित करत शर्यत सुरू ठेवली. तर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आरडाओरड करत पोलिसांच्या आदेशाचा अवमान केला. बैलांवर चाबकाचे फटके मारत क्रूरतेचे कृत्य करण्यात आले, असेही तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
अहिल्यानगरमध्ये बैलाच्या धडकेत एकाचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार येथील मोरे मळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत पाहणे एकाचा जीवावर बेतले आहे. या शर्यतीत एक बैलगाडा शर्यतीचा मार्ग भरकटल्याने प्रेक्षकांमध्ये घुसला आणि झालेल्या अपघातात संजय आसाराम जाधव (वय ५५, रा.बोल्हेगाव गावठाण) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २९ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आलमगीर ते मोरे मळा रोडवर घडली आहे. याबाबत प्रेक्षकांच्या सुरक्षेतीची काळजी न घेता बैलगाडा शर्यत आयोजित केल्याबद्दल आयोजकांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.