सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : ड्रग्जमुक्त सिटीची मोहिम हाती घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया यशस्वी पुर्ण केलेल्या असताना शहरात गांजाची मात्र, आवक वाढल्याचे दिसत असून, शंकरशेठ रस्त्यावर छापा कारवाई करून तब्बल ६० किलो गांजा पकडला आहे. हा गांजा कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी आला होता. तो स्विफ्ट कारमधून हा गांजा आला होता.
नदिम मोईज शेख (वय २८, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे, प्रविण उत्तेकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
अमली पदार्थामधील छोटे विक्रेते त्यासोबतच उत्पादक तसेच पुण्यात पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काही प्रमाणात अमली पदार्थांची आवक कमी झाल्याचा दावा पोलिसांचा आहे. मात्र, त्याप्रमाणात शहरात गांजाची आवक वाढली असल्याचे दिसते. शहरातील विविध ठिकाणी गांजा विक्री करताना, विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्यांना पकडले जात आहे. यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा शंकरशेठ रस्त्यावरील एका दुकानासमोर संशयित स्विफ्ट कार उभी असल्याचे दिसून आले. पथकाने चालकाकडे विचारपूस केली.
दरम्यान त्याच्या कारची झडती घेतली. तेव्हा या कारमध्ये पांढऱ्या नायलॉनच्या चार पोत्यात दोन-दोन किलोचे ३० पाकिट तयार केलेला ६० किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी लागलीच नदिम याला ताब्यात घेऊन गांजा जप्त केला. गांजाची किंमत तब्बल १२ लाख ७४० रुपये असून, त्याने हा गांजा कर्नाटकातून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो पुण्यात गांजा कोणाला विक्री करणार होता, याचा तपास करत आहेत. नदिम शेख कर्नाटकात फॅब्रीकेशनचे काम करतो. मुळचा कर्नाटकातील आहे. पुण्यात प्रथम आला की यापुर्वीही आला होता. त्याने यापुर्वी गांजा विक्री केला आहे का याचाही तपास सुरू आहे.
गांजा विक्रीस आलेल्या तिघांना अटक
सोलापूर महामार्गावरील मोकळ्या जागेत गांजा विक्री करणाऱ्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांकडून जवळपास १ किलो गांजा पकडला आहे. शुभम बापु पालखे (वय २१), मयुर विलास बोरकर (वय २५), अमन महंमद रफिक कोतवाल (वय २७, रा. सर्व. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी १९ हजार रुपयांचा ९३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तिघेही चिंतामणी मार्बल्सचे पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत थांबून गांजा विक्री करत होते.