पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी (Photo Credit - X)
मूर्तिजापूर: माना पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुम, साप्तवाडा व जामठी बु. येथील चार ठिकाणी धाड टाकून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३१ ऑक्टोबर रोजी माना पोलिसांनी केली.
कुरुम स्टेशन रोड (पहिला आरोपी) प्रेमदास दलपत तायडे (वय ५४) हा कुरुम स्टेशन रोडवर अवैध दारू विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून धाड टाकण्यात आली. आरोपीच्या ताब्यातील १२० लिटर सडका मोहमास (किंमत अंदाजे २४ हजार रुपये) तसेच ४० लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ८ हजार रुपये) असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पारधीबेडा कुरुम (दुसरा आरोपी) रामबाबू रामू पवार (वय २८) हा कुरुम ते कुरुम स्टेशन रोडने गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन धाड टाकली असता, त्याच्या ताब्यातील २० लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ४ हजार रुपये) आणि एक जुनी दुचाकी (किंमत अंदाजे २५ हजार रुपये) असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खापरवाडा (तिसरा आरोपी) खापरवाडा येथे धिरज सुधाकर (वय २५) याच्याकडून १८० एमएलचे २४ देशी दारू नग (किंमत १ हजार ९२० रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जामठी बु. (चौथा आरोपी) जामठी बु. येथे प्रेमदास दलपत तायडे (वय ५४) याच्याकडून १८० एमएलचे २६ देशी दारू नग (किंमत २ हजार ८० रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे चार आरोपींविरुद्ध माना पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माना पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार श्रीधर गुटटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, सहा. फौजदार राजेंद्र वानखडे, पोहेका मनोहर इंगळे, संदीप सरोदे, उमेश हरमकार, पोकों सुशिल आठवले, जावेद खान, आकाश काळे आणि महिला पोकों जयश्री गाडे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
हिंजवडी परिसरात 18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला; धक्कादायक कारणही समोर






