संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील अवैध धंद्याविरोधात वारंवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार कठोर भूमिका घेत आहेत. विशेष करून हुक्काबार तसेच पब याबाबत विशेष लक्ष दिले जात असतानाच पोलीस उपनिरीक्षकाने हुक्का पार्लरला परवानगी देऊन त्याच्याकडून प्रोटेक्शन मनी घेतल्याचा प्रकार समोर आला असून, आयुक्तांनी या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. त्यासोबतच अशा अवैध धंद्यांना सरंक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली केल्यास तुमची खैर नाही, असेही सूचित केले आहे.
शरद निवृत्ती नवले असे या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. मंहमदवाडी येथील बीबीसी रुफटॉप किचन अँड बारयेथील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. येथे १६ टेबलांवर ५७ तरुण-तरुणी हुक्का पित असल्याचे आढळून आले होते. हुक्का पार्लरवरील ही पुण्यात सर्वात मोठी कारवाई होती. हॉटेलचा मालक पार्थ अनिल वाल्हेकरने त्याच्याकडील चौकशीत एप्रिल २०२५ मध्ये हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात केली. त्याबाबत श्रेणी उपनिरीक्षक शरद नवले याच्याशी बोलणे झाले होते. त्याने हुक्का बार सुरु केल्याबद्दल गुडलकचे ३० हजार व एप्रिल महिन्यांचे ३० हजार रुपये असे ६० हजार रुपये १० एप्रिल २०२५ रोजी रोख स्वीकारले असल्याची माहिती दिली.
एका त्रयस्त व्यक्तीमार्फत ऑनलाईन ३० हजार रुपये दिले. शरद नवले यांनी हॉटेल मालकास बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात त्याच्याकडून ९० हजार रुपये स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याने शरद नवले यांना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले.
आणखी एक पोलीस कर्मचारी निलंबित
ट्रकचालकासोबत वाटमारी करणार्या पोलिस कर्मचार्याला पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबीत केले आहे. बापुराव पोपट ढोले असे त्याचे नाव आहे. ट्रक चालवित असताना, मोबाईलवर बोलत असल्याचा आरोप करून, त्याने चालकाला 15 हजार रुपये दंडाची भिती दाखवली. त्यानंतर दहा हजार रुपये त्याच्याकडून घेतले होते. ढोले याची खाबुगिरी चव्हाट्यावर आल्यानंतर त्याला चांगलाच दणका देण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर संबंधीत ट्रकचालकाने पुणे ग्रामिणच्या राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक ग्रामिण यांनी याबबातचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला होता. त्यानुसार ढोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 15 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता.