पुण्यात ड्रग्स जप्त (फोटो - istockphoto)
पुणे/अक्षय फाटक: पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला असून, त्यासोबतच एक पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, सराईताने “गेम” करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती समोर आली आहे.
बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तोसिम ऊफ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहरात दोन मोठी ड्रग्जप्रकरण समोर आल्यानंतर पुणे पोलिसांकडून ड्रग्जडिलर, पेडलर यांच्यावर नजर ठेवली जात आहे. त्यानंतरही शहरात छुप्या पद्धतीने ड्रग्जची विक्री होत आहे. तर, आता थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर देखील पोलीस सतर्क झाले आहेत. यादरम्यान, गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोन व खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी व पथक गस्त घालत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, बॉबी सुरवसे आणि तोसिम खान यांच्याबाबत माहिती मिळाली. ते शुक्रवार पेठेतील मारूती मंदिराजवळ डायमंड बिल्डींगच्या शेजारी थांबले असून, त्यांच्याकडे अमली पदार्थ व पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.
त्यानूसार, पथकाने छापा टाकून या दोघांना पकडले. तेव्हा बॉबी सुरवसे याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतूस तसेच बॉबी व तोसिम याच्याकडून १४ लाख ६० हजार रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ देखील मिळाला. त्यानूसार दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली. यावेळी त्यांनी अमली पदार्थ विक्री करण्यास आणल्याचे सांगितले. तर, दोघे ड्रग्जचे सेवन देखील करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोघांना अटककरून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक हे करत आहेत.
हेही वाचा: Pune Crime News: सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई: तब्बल सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट
बॉबी नेमका गेम कोणाचा करणार होता..!
बॉबी सुरवसे याच्यावर पुर्वीचा एक आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. तो गुन्हेगार आहे. त्याच्याकडे पिस्तूल का बाळगले याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने एकाचा “गेम” करण्यासाठी आणल्याचे सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे तो नेमका कोणाचा गेम करणार होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. वेळीच पोलिसांनी त्याला पकडल्याने मोठी घटना टळल्याची माहिती देण्यात आली.
सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट
सीमाशुल्क विभागाने (कस्टम) वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला सहा हजार किलो अमली पदार्थाचा साठा नुकताच रांजणगाव एमआयडीसी येथे नष्ट करण्यात आला. एका खासगी कंपनीच्या भट्टीत हा अमली पदार्थ नष्ट करण्यात आला. सीमाशुल्क विभागाने वर्षभरात वेगवेगळ्या कारवाई करून अमली पदार्थ तस्करी प्रकरणी १४ गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत २३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सहा हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.