ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी
तक्रारीनुसार, ४ डिसेंबर रोजी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये, तर कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे (३७ वर्षे, रा. कुनकी, ता. जळकोट, जि. लातूर) याने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीच्या अनुषंगाने ४, ७ व ११ डिसेंबर रोजी एसीबीने याची पडताळणी केली. या दरम्यान कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र, कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे याने ऍट्रॉसिटी अर्थसाह्याचा दुसरा हप्ता खात्यात जमा करून देण्यासाठी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर ११ व १२ डिसेंबर रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार देत भेट घेणे टाळले. अखेर ३१ डिसेंबर रोजी रमेश वाघमारे यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या अंगझडतीत होंडा अॅक्टिव्हा स्कूटर (अंदाजे किंमत ४० हजार रुपये), वनप्लस कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत १० हजार रुपये) व दोन पेन मिळून आले आहेत. मोबाईलची तपासणी करून आवश्यक असल्यास जप्तीची कार्यवाही केली जाणार असून आरोपीची घरझडती प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई येथील समाजकल्याण कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणात शासनातर्फे फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे यांनी कामकाज पाहिले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी व शशिकांत हजारें यांचा समावेश होता. या संपूर्ण कारवाईस छत्रपती संभाजी नगर विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शन होते.






