संग्रहित फोटो
पुणे : पुण्यासारख्या महानगरात बांगलादेशातून आलेल्यांची संख्या मोठी असून, वेगवेगळ्या भागात वास्तव करणाऱ्यांना पुणे पोलिसांकडून पकडले जात असताना स्वारगेट परिसरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडले आहे. महर्षीनगर भागात ही कारवाई केली असून, मध्यभागातूनच बांगलादेशीला पकडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी एहसान हाफिज शेख (वय ३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश, तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेख कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. २०१४ मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर तो पुण्यात वास्तव्याला आहे. त्याने कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वेगवेगळ्या ठिकाणी तो कपडे विक्रीचा व्यवसाय करत होता. दरम्यान, स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. नंतर पोलिसांच्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा लावून शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळवली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
भारतात राहण्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना भारतात घुसखोरी करून डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शिताफीने अटक केली आहे. शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याच्या बाजुला कोळेगाव आहे. कोळेगावातील कृष्णा मंदिराच्या मागे अनिल पाटील चाळीत या तीन महिला राहत होत्या. कोळेगावात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ एक पथक स्थापन केले. या महिला कोळेगावात राहतात का, त्या कोणत्या व्यवसाय करतात याची पहिले गुप्त माहिती काढली. या माहितीची खात्री झाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक कोळेगावात दाखल झाले. त्यांनी महिलांना ताब्यात घेतले.