संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचे सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्रास दिल्याच्या कारणावरून मित्राचा खून करुन पसार झालेल्या तरुणाला आंबेगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून अटक केली आहे.
सूरज गणेश सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दीपक बंडगर (वय २१, रा. नऱ्हे) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रोहित नामदेव ढमाळ (वय २१, रा़ योगमुद्रा बिल्डिंग, भुमकर वस्ती, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक प्रियंका गोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दीपक, सूरज आणि राेहित हे मित्र आहेत. सूरज याने मानलेल्या बहिणीचे आरोपी रोहित याने बनावट खाते उघडले होते. त्यावरुन तो तिलाच बोलत असत. यावरून त्यांच्यात वाद झाले होते. १४ जून रोजी सूरज, दीपक, रोहित हे जांभुळवाडी तलाव भागात फिरायला गेले होते. रोहित आणि सूरज तलावाच्या बंधाऱ्याजवळ थांबून सिगारेट ओढत होते. त्या वेळी रोहित व सूरज यांच्यात पुन्हा वाद झाला. सूरजने रोहितच्या डाेक्यात दगड घातला. या घटनेत रोहित गंभीर जखमी झाल्याने दीपक घाबरला. तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी घाबरलेल्या दीपकला आईने विचारणा केली. तेव्हा त्याने रात्री सूरज आणि राेहित यांच्यात वाद झाले. सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातल्याची माहिती त्याने आईला दिली.
दरम्यान त्यानंतर दीपक आंबेगाव पोलीस ठाण्यात गेला. त्याने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा रोहित बंधाऱ्याजवळ मृतावस्थेत पडला होता. चौकशीत सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती मिळाली. सूरजचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात तो इंदूरला पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला इंदूरमधून ताब्यात घेतले.