जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?
घटना घडल्यानंतर तब्बल चोवीस तासांनंतर गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत गायकवाड याच्या पत्नीने भाजपाकडून प्रभाग ५ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढविलेली आहे. निवडणुकीचा निकाल अजून लागलेला नाही. तत्पूर्वीच घडलेल्या घटनेमुळे जामखेड शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीतील प्रचारावेळी आमदार रोहित पवारांनी भाजपाकडून जामखेडमध्ये गुंड, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याची टीका प्रत्येक भाषणात केली होती. यानंतर मतदान प्रक्रिया तीन दिवसांपूर्वी पार पडली. मातमोजणी अजून व्हायची आहे. त्या अगोदरच माजी नगरसेवक तथा निवडणुकीतील उमेदवार पती गजाआड झाल्याने आमदार रोहित पवारांनी केलेल्या टिकेला पृष्टी मिळाली आहे. तसेच यासंदर्भात सर्वप्रथम आमदार पवार यांनीच सोशल मीडियावर पोस्ट टाकून संशयाची सुई गायकवाड याच्या दिशेने वळविली होती. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी पडद्यामागे झालेल्या सर्व हालचाली निष्फळ ठरल्या.
आत्महत्या केलेली नर्तिका दिपाली हिची आई दुर्गा गायकवाड यांनी दिलेल्या फियदिवरुन संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फियदितील आशय असा होता की संदीप गायकवाड हा दिपाली पाटील हिला लग्न करण्यासाठी वारंवार मागणी करीत होता. या मागणीसाठी त्याच्याकडून दिपालीचा छळ सुरू होता. त्यांच्या या छळाला कंटाळून दिपाली हिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे ही घटना गुरुवार (ता.०४) रोजी घडली. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी आवाज उठविला आणि लक्ष वेधणारी पोष्ट सोशल मेडियाच्या माध्यमातून शेअर केली. त्यानंतर तब्बल पाच तासांनी जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. घटना घडल्याची वेळ आणि गुन्हा दाखल झाल्याची वेळ यादरम्यान संशय व्यक्त करणारी चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू होती. मात्र यासंदर्भात गुन्हा दाखल होईल पर्यंत बोलण्यासाठी कोणी धजावत नव्हते. दरम्यान आमदार पवार यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आणि संबंधित व्यक्ती विरुद्ध संशय व्यक्त केला.
हे प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीशी संबंधित होते म्हणून तर गुन्हा दाखल होण्यास वेळ लागला अशीही चर्चा शहरात सुरू आहे, मात्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर आमदार रोहित पवार हे गप्प बसणार नाहीत आणि हे प्रकरण अंगाशी येईल म्हणून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण केली.






