संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसही ॲक्शन मोडवर आले आहेत. अशातचं आता ताडीवाला रोड येथील तरुणावर हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात टोळीवर मोक्का लावल्यानंतर फरार झालेल्या गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातील रायचूर येथून पकडले. गेले सहा महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
सौरभ तिमप्पा धनगर (वय २४, रा. ताडीवाला रोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. हा प्रकार ताडीवाला रोडवरील मारुती मंदिर चौकात १८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी पावणे सात वाजता घडला होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांनी केली आहे.
गणेश संजय पोळ (वय २९) हे त्यांचा मुलगा रोनिक याला घेऊन दुचाकीवरुन घरी जात होते. तेव्हा मारुती मंदिर चौकात सौरभ धनगर, आकाश पंडित व साहिल वाघमारे यांनी त्यांना अडवले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फायटर, बांबुची काठी, लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सौरभ धनगर हा फरार झाला होता. पोलिसांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार व पोलीस अंमलदार बडे, भोकर यांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलीस पथकाने कर्नाटकातील रायचूर येथून पुण्यात आणून अटक केली.
हे सुद्धा वाचा : शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला दांडक्याने मारहाण; पळून जाताना पाठलाग केला अन्…
चोऱ्या करणाऱ्याला घेतले ताब्यात
जैन साधकांचा वेष परिधान करून जैन मंदिरात घुसून चोऱ्या करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. त्याने पुण्यासह राज्यातील घाटकोपर वाई, चिखली, डोंबिवली अशा ठिकाणी देखील चोऱ्या केल्याची माहिती समोर आली असून, पैशांची चणचण भासत असल्याने चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नरेश आगरचंद जैन (वय ४५, रा. बोम्बे चाळ, सी.पी. टैंक गिरगाव, व्ही. पी. रोड, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरिक्षक युवराज नांद्रे, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, कुंदन शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे.