संग्रहित फोटो
पुणे : कुविख्यात गँगस्टर निलेश घायवळ लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले असून, ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्र व्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे अखेर समोर आले आहे. घायवळ हा ६ महिन्यांच्या (६ फेब्रुवारीपर्यंत) व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना दिली आहे. नंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून, कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
निलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान निलेश याने ‘घायवळ’ या नावाने पासपोर्ट मिळवून सहा महिन्यांच्या व्हिझावर लंडन गाठले. परंतु, पासपोर्ट जमा करण्याचे आदेश असताना तो परदेशात गेला कसा असा प्रश्न समोर आला होता. त्या तपासात अनेक गोष्टींचा खुलासा झाला. तेव्हा पुणे पोलिसांकडून त्याला पुन्हा देशात आणण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत.
पुणे पोलिसांनी भारतातील यूके हायकमिशनला पत्र व्यवहार केला होता. त्यात घायवळबाबत माहिती मागविली होती. पोलिसांच्या या पत्राला आता यूके हायकमिशनने ईमेलव्दारे उत्तर दिले आहे. त्यानूसार घायवळ हा यूकेमध्ये असून, तो व्हिजीटर व्हिसावर आल्याचे त्यांनी कळविले आहे. घायवळचा व्हिसा ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे. मात्र, त्याआधीच त्याला देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याबाबत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, ‘नीलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याचे हाय कमिशनकडून अधिकृतपणे कळविण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्याला देशात आणण्यात येईल.






