वेळेत तक्रार दिल्यास फसवणूक झालेली रक्कम मिळू शकते परत; 'इथं' प्रत्यक्ष आला अनुभव
रहिमतपूर : तक्रारदार विधेश गोपाळ बाजारे (रा.रहिमतपूर, ता.कोरेगांव, जि. सातारा) यांना एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून त्यांचे बँक खात्याची केवायसी न केल्यास त्यांचे बँक खाते बंद करण्यात येईल, असे सांगून तक्रारदार यांच्या व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली. तक्रारदार यांनी सदरची लिंक उघडली असता तक्रारदार यांचे बँक खात्यातून रक्कम रुपये १६००० ट्रान्सफर झाल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आले. तक्रारदार यांना त्यांची सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदार यांनी फसवणुकीबाबत सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंद केलेली होती.
तक्रारदार यांची तक्रार एनसीसीआरपी पोर्टल (सायबर पोर्टल) वर नोंद झाल्यानंतर रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडून सदर तक्रारीचा कौशल्यपूर्ण तपास केला आणि तक्रारदार यांचे तक्रारीतील त्यांची फसवणूक झालेली 16000 ची रक्कम ही संबंधित बँक खाती गोठवण्यात आली. तक्रारदार यांची फसवणूक झालेली व तपासामध्ये गोठविण्यात आलेली रक्कम ही त्यांना परत मिळणेबाबत न्यायालयाचे आदेश प्राप्त करुन तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम १६००० ही तक्रारदार यांना परत करण्यात रहिमतपुर पोलीस ठाणेचे सायबर विभागास यश प्राप्त झालेले आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा
ही कारवाई ही पोलीस अधिक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे व सायबर विभागाचे दीपक देशमुख यांनी केली आहे.
तसेच सर्व नागरिकांनी त्यांची वैयक्तिक माहिती सोशल मीडिया अॅपवर प्रसारित न करण्याचे तसेच सायबर फसवणूक टाळण्याकरीता अनोळखी मोबाईलवरुन आलेल्या apk फाईल, तसेच लिंक ओपन न करण्याचे, अनोळखी व्यक्तींनी केलेल्या व्हिडिओ कॉलवरुन पैशांची मागणी केल्यास घाबरुन न जाता पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याचे आवाहन रहिमतपुर पोलीस ठाणेचे वतीने करण्यात आलेले आहे.
ट्रेंडपासून सावध राहण्याच्या सूचना
तसेच सध्या सुरु असणारा घिबीली व थ्रीडी फोटो ट्रेंडपासून सावध राहण्याचे तसेच सदरच्या ट्रेंडमध्ये आपल्या मोबाईल गॅलरीचा अॅक्सेस न देणेबाबत पोलिसांनी आवाहन केले आहे. तसेच सायबर फसवणुक झाल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर तक्रार नोंद करण्याचे अथवा तात्काळ पोलीस ठाणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.






