संग्रहित फोटो
पुणे : सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती तसेच एकाच पोलीस ठाण्यावर येणारा ताण लक्षात घेऊन नव्याने ५ सायबर पोलिस ठाणे निर्मितीसाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे पोलिसांकडून तसा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाला पाठविला जाणार असून, प्रत्येक झोनला एक सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. तर, मनुष्यबळाची मागणी देखील करण्यात येणार आहे.
पुणे शहरात सायबर गुन्ह्यांसाठी शिवाजीनगर येथे पोलिस ठाणे आहे. साधारण दररोज ६० ते ८० तक्रारी अर्ज दाखल होतात. परिणामी पोलिसांच्या कामकाजावर ताण पडतो. सायबर गुन्ह्यांचे कामकाज तांत्रिक विश्लेषणावर होते. यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास देखील वेळ लागतो. परंतु, त्यामानाने दरवर्षी या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने ५ सायबर पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचे नियोजीत आहे.
शिवाजीनर येथील सायबर पोलिस ठाणे केंद्रस्थानी राहणार असून, इतर पाच पोलिस ठाणी परिमंडळानिहाय तयार केली जाणार आहेत. या सायबर पोलिस ठाण्यांसाठी नवीन मनुष्यबळाची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. याचा प्रस्ताव पुणे शहर पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला नुकताच पाठविला आहे.
एक हजार नवीन मनुष्यबळाची मागणी
पुणे शहरात नव्याने ७ पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. त्यात ८५० मनुष्यबळ देखील मिळाले. परंतु, एकूण पोलिस ठाणे व लोकसंख्येचा विचार केल्यानंतर मनुष्यबळ अधिकच कमी आहे. त्यामुळे आणखी मनुष्यबळाची मागणी करण्यात येणार आहे. नव्याने ८५४ महिला व पुरूष कर्मचारी तसेच १०५ चालक असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सहाव्या झोनच्या निर्मितीस अडचणी
पुणे शहर पोलिस आयुक्तालयात लवकरच सहाव्या झोनची निर्मिती होणार आहे. त्याचे कामकाज सुरू आहे. परिमंडळ चार व पाच आणि परिमंडळ तीन यामध्ये सर्वाधिक पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्तांचे येथील कामकाज वाढले आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनीधींच्या मतदार संघाचा विचार केल्यानंतर एकापेक्षा अधिक झोनमध्ये त्यांचा मतदार संघ समाविष्ठ आहे. त्यामुळे त्यांना विचारात घेऊन लवकरच सहाव्या झोनची (परिमंडळाची) निर्मिती करण्यात येणार आहे. झोनच्या निर्मितीमुळे पोलिसांच्या कामात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.