विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची खबरदारी (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील चार सराइत गुन्हेगारांना एकाचवेळी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी हे आदेश दिले आहेत. वनराज महेंद्र जाधव (वय २१), यशराज आनंद इंगळे (वय २३ ), हिमालय ऊर्फ गोलु मिटु बिश्त (वय २१, तिघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि मयुर विष्णु गुंजाळ (वय २६, रा शनीआळी, येरवडा) अशी तडीपार केलेल्या सराइतांची नावे आहे.
वनराज जाधव टोळीप्रमुख आहे. जाधव, इंगळे, बिश्त, गुंजाळ यांच्यावर खून, दहशत माजविणे, तोडफोड, अवैधरित्या शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जाधवसह साथीदारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तयार केला. तो प्रस्ताव पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना सादर केला होता. या प्रस्तावाला उपायुक्त जाधव यांनी मंजुरी दिली. त्यानंतर जाधव याच्यासह चौघांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.
हेही वाचा: दारूसाठी काय पण! चोरट्यांनी थेट बंद असलेले बार अँड रेस्टॉरंट….; पोलिसांकडून गुन्हा दाखल
भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पाठिमागे बसलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर, दुचाकी चालक तरुण जखमी झाला. कात्रज भागात हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी कृष्णा श्रीवास्तव (वय २४, रा. वडाळा, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार करण प्रवीण चिकणे (वय २४, रा. दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) हा जखमी झाला आहे. चिकणे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी ट्रकचालक सागर विलास थोरा (वय २९, रा. काशीद बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार करण आणि त्याची मैत्रीण सोनी कात्रज भागातून निघाले होते. त्यावेळी गुजरवाडी फाटा परिसरात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात पाठिमागे बसलेली सोनी या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.
हेही वाचा: Pune Accident News: कात्रजमध्ये ट्रकची दुचकीला धडक; दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू
कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल
पुणे शहरातील अवैध धंद्याबाबत तंबी देऊन अन् ६५ जणांची उचलबांगडी केल्यानंतर देखील त्यांची जागा आता नव्या वसूलीदारांनी घेतली आहे. परिणामी अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असून, कात्रजमधील एका हुक्का पार्लरबाबतचा स्मरणपत्राचा एक मॅसेज सध्या पोलीस दलात प्रचंड व्हायरल होत आहे. स्मरणपत्राच्या मॅसेजमध्ये ६ वेळा हुक्का पार्लरबाबत तक्रार करूनही तो सुरूच आहे, असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्याभरापुर्वीच येथे कारवाई केली होती. तरीही तो हुक्का पार्लर सुरू असल्याचे सांगितले जाते. तत्पुर्वी नुकताच कात्रजमधील तीन पत्ती जुगारावर छापा मारून भारती विद्यापीठ पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसते.