पेण/ विजय मोकल: तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या परिसरात पेण तहसील, वनविभाग आणि परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अनेक बेकायदेशीर दगडखाणी आणि क्रशर प्लांट आहेत. यामधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांच्या माध्यमातून दुरशेत रस्त्यावर माल वाहतूक होते. यामुळे मुंबई गोवा महामार्ग ते दुरशेत रस्त्याला मोठंमोठाले खड्डे पडून अनेक अपघात झाले असतानाही तहसील, महसूल आणि पेण परिवहन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुरशेत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या दगडखाण आणि क्रशर्स माफीयांना अभय देत असल्याचा आरोप दुरशेत ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी पेण ,तहसीलदार पेण यांच्यासह पेण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना पत्राद्वारे तक्रारी करूनही आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने दुरशेत ग्रामस्थांमध्ये आधीच संतापाची लाट असताना ओव्हरलोडेड अवजड वाहनांमधून मालवाहतूक करण्यासाठी 16 वर्षीय अल्पवयीन चालकाचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन वाहन चालक अवजड वाहन चालवत असताना दुरशेत ग्रामस्थांनी संबंधित वाहन थांबवून जोपर्यंत वाहनाचे मालक येत नाहीत तोपर्यंत वाहन न सोडण्याचा निर्णय घेत रस्ता रोको केला.
संतप्त दुरशेतकरांनी जोपर्यंत अल्पवयीन वाहन चालकाच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत वाहने न सोडवण्याचा निर्णय घेत अजून संताप व्यक्त केला. दुरशेत रस्त्यावरून खडीने भरलेला ओव्हरलोडेड डंपर वाहन क्रमांक MH 06 CP 1754 चालक विजेंद्र कुमार साकेत भरधाव वेगाने धूळ उडवत जात असताना दुरशेत गावातील तरुणांनी त्या डंपरला अडवले असता सदर डंपरमधील चालक हा फक्त 16 वर्षीय अल्पवयीन असल्याचे समजले. म्हणून आधीच संतप्त असलेल्या दुरशेत ग्रामस्थांनी दुरशेत रस्त्यावर अवजड वाहनांसाठी रास्ता रोको केला.
दुरशेत रस्ता कोणीही बनविला असला तरी तो आमच्या ग्रामस्थांच्या हक्काचा आहे. त्यावर पहिला अधिकार आमचा आहे असे ग्रामस्थांनी त्यांना ठणकावून सांगितले. रस्ता कोणी माल वाहतुकीसाठी बनवला असला तरी त्यावरून अल्पवयीन चालकांनी वाहने चालवायची का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांना कायद्याचा धाक दाखवून रास्ता रोको आंदोलन बंद करण्यास सांगितले. परंतु ग्रामस्थांनी त्यासही ठाम नकार देऊन पोलिसांनाही प्रतिप्रश्न केले. वाहनमालक सावनी इन्फ्रा आणि वाहनचालक विजेंद्र कुमार साकेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत दुरशेत ग्रामस्थ हे पेण पोलीस ठाणे येथे ठिय्या देऊन बसून होते.