केरळ: केरळच्या कोलाम जिल्ह्यात रांगोळी काढणं गुन्हा ठरलं आहे.. एका मंदिरात पुकलम म्हणजे रांगोळी काढण्यात आली आणि मंदिराजवळ 50 फुटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फ्लेक्स बोर्ड लावण्यात आला होता. यामुळे पोलिसांनी रांगोळी काढणाऱ्या २७ वर्षीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून वातावरण तापलं आहे. रांगोळी काढणं आणि फ्लेक्स लावल्याचे हे कृत्य प्रतिस्पर्धी राजकीय गटाला डिवचण्यासाठी आणि दंगा भडवण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.
मंदिर प्रश्नाचा दावा काय?
मंदिर प्रशासनाच्या दावा आहे की मंदिर परिसरात रांगोळी काढणे हे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. ही घटना जिल्ह्यातील मुथुपिलक्क येथील पार्थसारथी मंदिरातील आहे. मंदिर समितीचे सदस्य मोहनन यांच्यानुसार, रांगोळीत ऑपरेशन सिंदूर लिहिले आहे तर आरएसएसचा एक ध्वज रेखाटण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात रांगोळीतून असा ध्वज रेखाटण्यावरून यापूर्वी सुद्धा वाद आणि धक्काबुक्की झाली असल्याचे मंदिर समितीच्या सदस्याचे म्हणणे आहे.
27 स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल
मंदिर समितीच्या एका पदाधिकाऱ्याने या वादावर प्रकाश टाकला. त्यानुसार सततच्या वादाला कंटाळून समितीने हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने 2023 मध्ये मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा ध्वज आणि सजावटीला मनाई केली आहे. तरीही RSS च्या स्वयंसेवकांनी मंदिर परिसरात फुलांची आरस केली. त्याला लागूनच हिंदू ध्वज रेखाटला. फुलांची एक रांगोळी काढली. त्याखाली ऑपरेशन सिंदूर असे लिहिले. हा सर्व प्रकार हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. यामुळे दोन समाजात वाद उफाळू शकतो. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आम्ही ऑपरेशन सिंदूरचा आदर करतो. पण स्वयंसेवक दंगा व्हावा, वाद उफळावा यासाठी असा प्रकार घडवून आणत असल्याचे मंदिर समिती सदस्यांचे म्हणणे आहे. मंदिर समिती सदस्य अशोकन सी यांच्या तक्रारीनंतर केरळ पोलिसांनी 27 स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला.
भाजपच या कारवाईला हायकोर्टात आवाहन देणार
भाजपने या सर्व प्रकरणाचा निषेध केला. कोल्लम जिल्ह्यात 27 स्वयंसेवकांवर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक आणि धक्कादायक असल्याचे भाजपने म्हटले आहे. केरळमध्ये जमात-ए-इस्लामीचे सरकार आहे की पाकिस्तानचे असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी विचारला आहे. भाजप या कारवाईला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर लिहिणे, पुक्कलम, रांगोळी काढणे आणि आमचे स्वाभिमानाचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा फ्लेक्स लावणे कधीपासून या देशात गुन्हा ठरत आहे, असा सवाल करत त्यांनी केरळ सरकारवर निशाणा साधला.