संग्रहित फोटो
सांगली : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पेठनाका येथील मणिकंडन हॉटेलच्या पार्किंगमधून ट्रक चोरून कर्नाटकात स्क्रॅप करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली असून, एक पसार आहे.
महादेववाडी (ता. वाळवा) येथील सिकंदर पठाण यांच्या मालकीचा मालवाहू ट्रक दिनांक २४ एप्रिल रोजी पेठनाका येथील हॉटेल मणिकंडन येथे पार्क केला होता. मध्यरात्री चोरट्यांनी ट्रक चोरून नेला होता. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना सांगली रेल्वे स्थानकावर रेकॉर्डवरील आरोपी असिफ शेख येणार असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अटक करण्यात आलेला असिफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, कर्मचारी अनिल ऐनापुरे, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, अनंत कुडाळकर, संकेत कानडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रेल्वे स्थानक परिसरात सापळा
पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला. यावेळी आसिफ शेख आणि महाबूबसहाब हकीम या दोघांमध्ये पैशांचा व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी दोघांना ताब्यात घेऊन शेख यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ ९८ हजार रुपये मिळाले. पेठनाका येथील हॉटेलसमोरून ट्रक चोरून हुबळी येथील पंतोजी याला स्क्रॅप करण्यासाठी दिला होता. हकीम हा स्क्रॅप केलेल्या ट्रकचे पैसे देण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. पथकाने दोघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी इस्लामपूर पोलिसांकडे वर्ग केले.
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.