सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : वैष्णवी हगवणेचा पती अन् दिराला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देताना विशेष मेहरबानी केल्याचे दिसत असून, सामान्य नागरिकांना अर्धा वर्ष किंवा वर्षभराची वाट शस्त्र परवाना मिळवताना पहावी लागते. मात्र, हगवणे बंधूंना केवळ सव्वा महिन्यात पुर्ण प्रक्रिया पार पाडून सुपर फास्ट पद्धतीने पिस्तूल परवाना देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही विशेष मेहरबानी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिस्तूल परवान्यासाठी अर्ज करताना खोटा पत्ता दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
शशांक हगवणे याने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी वारजेतील एका वन बीएचके फ्लॅटसाठी केवळ साडेतीन हजार रुपये भाडे आणि दहा हजार डिपॉझिटवर भाडेकरार केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, १३ ऑक्टोबरला त्याने पुणे पोलीस आयुक्तालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला. अवघ्या ५ दिवसांत अर्ज वारजे पोलिसांकडे पडताळणीसाठी पोहोचला. एक महिन्याच्या आत, १५ नोव्हेंबरला कागदपत्रांची तपासणी पूर्ण करून अर्जाला पुणे पोलीस आयुक्तालयात सहीसाठी पाठवण्यात आले. फक्त १ आठवड्याने म्हणजे, २२ नोव्हेंबर २०२२ रोजी शशांकला शस्त्र परवाना देण्यात आला. या अर्जावर त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांची एनओसी होती.
सुशील हगवणे यानेही २८ सप्टेंबर २०२२ रोजी कोथरूडमध्ये वन रूम किचन फ्लॅटसाठी पाच हजार रुपये भाडे आणि दहा हजार डिपॉझिटवर भाडेकरार केला. ३० सप्टेंबरला त्याने कोथरूड पोलीस ठाण्याअंतर्गत शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला. त्याचा अर्ज १९ ऑक्टोबरला पोलीस आयुक्तालयात पाठवला. १ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला परवान्याची मंजुरी मिळाली. सुशीलच्या अर्जावर त्याची पत्नी मयुरी हगवणे यांची एनओसी होती.
दरम्यान, एका व्यक्तीने ३१ मार्च २०२३ रोजी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्याचा अर्ज निकाली लागण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. पण, तीच प्रक्रिया हगवणे बंधूंसाठी ‘फास्ट ट्रॅक’ नुसार चालली आणि त्यांना परवाना मिळाला. यामुळे आता हा परवाना व ते देणारे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून आता याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
शशांकने असा मिळवला परवाना
कसा मिळवला सुशील हगवणेने शस्त्र परवाना?