कोकणातील दोन वर्षापूर्वीचं हत्याकांड उजेडात (फोटो सौजन्य-X)
कुडाळ : चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (वय ३५) याचा अखेर खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पैशाच्या देवघेवीतून मार्च २०२३ मध्ये सिद्धेश शिरसाठ यासह अन्य तिघांनी संगनमताने त्याचा खून केला. कुडाळ पंचायत समितीनजीक असलेल्या अमोल शिरसाट यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर रातोरात बिडवलकर या युवकाचा मृतदेह सातार्डा (ता. सावंतवाडी) येथील एका स्मशानभूमीत जाण्यात आले. त्याच रात्री पहाटे त्याची राख व हाडे गोळा करून ती तेरोखोल नदीपात्रात फेकून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी चौघांवरही खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अजूनही काही जणांचा हात असल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत असल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान सिद्धिविनायक बिडवलकर याचा मृत्यू हा या सर्वांनी केलेल्या जबर मारहाणीतून झाला आहे. सिद्धिविनायक बिडवलकर हा युवक बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार कुडाळ व निवती पोलीस स्टेशनमार्फत संयुक्तपणे तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बीडवलकर यांचे अपहरण केल्याप्रकरणी सिद्धेश शिरसाट (रा. कुडाळ), गणेश नार्वेकर (रा. माणगाव), सर्वेश केतकर (रा. सातार्डा) व अमोल शिरसाट (राहणार कुडाळ) यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या चौघांनाही पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर पोलिसांनी ताब्यात असलेल्या संशयित आरोपींकडे तपास केला. त्यानंतर यातील खरी व धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, सिद्धिविनायक बिडवलकर याचा या चौघांनी मिळून मारला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना मार्च २०२३ अखेर घडली.
बिडवलकर या युवकाने सिद्धेश शिरसाट यांच्याकडून ५५ हजार रुपये व गणेश नार्वेकर यांच्याकडून २१ हजार रुपये घेतले होते. ते मिळत नसल्याने सिद्धिविनायक बिडवलकर याला त्याच्या चेंदवण येथील घरातून उघलून आणले. प्रथम त्याला सिद्धेश शिरसाट याच्या घरी नेले. तेथे काही प्रमाणात मारहाण केल्यानंतर त्याला अमोल शिरसाट हा राहत असलेल्या कुडाळ पंचायत समिती नजीकच्या घरात घेऊन गेले. तिथेही त्याला मारहाण करण्यात आली. या माराहाणीतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, रात्री ८ वाजता त्याला भाड्याने गाडी बोलवून सातार्डा बाजारपेठनजीक असलेल्या एका गावच्या स्मशानभूमीत नेऊन रात्री ९.३० वा. जाळण्यात आले.
या जाळलेल्या मृतदेहाची राख शांत झाल्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ती राख व हाडे हे सर्व गोळा करून त्याच रात्री तेरेखोलच्या नदीपत्रात फेकून देऊन पुरावाही नष्ट केला. पोलिसांनी यापूर्वी या चौघांवर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता याप्रकरणी खून केल्याप्रकरणी भादवि कलम ३०२ व पुरावा नष्ट केल्याचे भादवि कलम २०१ व १२०-ब ही कलमे नव्याने लावण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ते अमोल शिरसाट यांच्या मालकीचे पंचायत समितीनजीक घर असून ते बँकेने आता लोन प्रकरणी सील केले आहे. या घटनेमध्ये अजून काही संशयतांचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेबाबत निवती पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी सातार्डा येथे जाऊन घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.