नाशिक: नाशिक शहरातील ध्रुवनगर परिसरात अवैध सावकारांच्या तगाद्याला कंटाळून एका कंत्राटी कंपनी कामगाराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मृत व्यक्तीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोटच्या आधारे गंगापूर पोलिसांनी तीन खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र भगवान सूर्यवंशी (वय 39, रा. शारदा अपार्टमेंट, ध्रुवनगर) असे आहे.
Uttar Pradesh: ‘हात खाली कर’ असे ओरडत विद्यार्थ्याला मारहाण, कॉलेज कॅम्पसमधील व्हिडीओ वायरल
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हे सातपूर एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. 2021 ते 2022 या कालावधीत त्यांनी घरखर्च आणि इतर वैयक्तिक गरजांसाठी खासगी सावकारांकडून एकूण 7.70 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यामध्ये ६ टक्के व्याजदराने 4.70 लाख आणि 4 टक्के दराने 3 लाख रुपये घेतले गेले होते.
राजेंद्र यांनी या रकमेतील काही भागाची परतफेडही केली होती, ती ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात होती. मात्र, कर्जाची पूर्ण परतफेड न झाल्याने संशयित सावकारांनी सातत्याने त्रास देण्यास सुरुवात केली. पैशाची मागणी करताना त्यांनी राजेंद्र यांच्यावर मानसिक दबाव टाकत वसुलीसाठी तगादा लावला. याच त्रासाला कंटाळून राजेंद्र यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या खिशात सुसाईड न सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये काही सावकारांची नावे नमूद करण्यात आली होती. ज्यांच्यामुळे त्यांनी हे टोकाचे पॉल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावकारांना अटक
या प्रकरणात श्यामराव पाटील उर्फ गिरणारकर (वय 53, रा. दुगाव), मोहन खोडे (वय 45, रा. अथर्व रेसिडेन्सी, शिवाजीनगर) आणि नंदू बच्छाव (रा. बागलाण) यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गिरणारकर आणि खोडे यांना अटक करण्यात आली असून, त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिसरा संशयित नंदू बच्छाव अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घर नावावर करण्याचा दबाव
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, गिरणारकर आणि खोडे या दोघांनी कर्ज फेडल्याशिवाय राजेंद्र यांचे घर आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला होता. त्यांनी घराची कागदपत्रे नोटरी करून घेतल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी
या प्रकरणात राजेंद्र यांचे बंधू अनिल परदेशी (रा. सातपूर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्याआधारे पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे ध्रुवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अवैध सावकारांच्या मनमानी वसुली पद्धतीमुळे सामान्य नागरिकांचे जीवन संकटात आले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.