9 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेहावर कापूर टाकून...हादरवणारी घटना (फोटो सौजन्य-ट्विटर)
हरियाणाच्या गुरुग्राममध्ये शेजारच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने 9 वर्षांच्या मुलीचा गळा दाबून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कापूरने जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हरियाणाच्या गुरुग्राममधील सेक्टर 107 येथील ग्लोबस सिग्नेचस सोसायटीमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सोमवारी (1 जुलै) 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने बाजुला राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीचा गळा दाबून आधी हत्या केली. त्यानंतर मृतदेहला कापूरच्या साहाय्याने आग लावली. कारण या 9 वर्षीय मुलीने आरोपीला फ्लॅटमधून दागिने चोरताना रंगेहात पकडले होते, त्यामुळे 16 वर्षीय मुलाने घाबरुन तिची हत्या केली. 9 वर्षीय मुलगी आणि आरोपी 16 वर्षीय मुलगा या दोघांचे कुटुंबीय गुरुग्राममधील सेक्टर 107 मध्ये असलेल्या सिग्नेचर ग्लोबल सोलेरा या दोन वेगवेगळ्या टॉवरमध्ये राहतात आणि त्यांच्यात चांगले संबंध होते. या घटनेच्या वेळी मृताची आई आरोपी मुलाच्या घरी होती. दरम्यान, त्याचे वडील कार्यालयात गेले होते.
पोलिसांनी सांगितले की, 16 वर्षांचा मुलगा पीडितेच्या दोन वर्षांच्या भावासोबत खेळायचा. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आरोपी पीडितेच्या भावाला घेण्यासाठी घरी गेला आणि तिच्या भावाला स्वत:च्या घरी घेवून आला. त्यानंतर काही वेळेनंतर पीडितेची आई तिच्या मुलाला घेण्यासाठी आरोपीच्या घरी गेली. त्यानंतर मुलाने लगेच पीडितेच्या घरी जाण्याची संधी साधली. 9 वर्षीय मुलीला अभ्यासात मदत करतो, असं सांगून 16 वर्षीय आरोपी तिच्या घरी गेला.
साधारण, सकाळी 9.30 वाजता मुलीने आईला फोन केला की दूधवाला आला आहे. यानंतर मुलीची आई 10 वाजता घरी पोहोचली असता घराचे लोखंडी गेट बंद दिसले. त्यानंतर पीडितेच्या घरात 16 वर्षीय मुलाग दिसला, म्हणून मुलीच्या आईने दरवाजा उघडाला सांगितले. पण आरोपीने जाणूनबुजून दुर्लक्षित केले. यानंतर महिलेने अलार्म लावला, शेजारी आणि सोसायटीच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना बोलावले. 10 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाने बाल्कनीतून घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला तर बेडवर अल्पवयीन मुलगी जळालेल्या अवस्थेत दिसली.
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी जेव्हा आरोपीने मुलीच्या घरातून चोरी केली तेव्हा मुलीची आई आरोपीच्या घरी होती. मुलगी चौथीत शिकत होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा दहावीचा विद्यार्थी आहे. आरोपीने आधी दोन चोरट्यांनी घरात घुसून मुलीची हत्या केल्याचा दावा केला होता, मात्र नंतर आरोपीने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, गुन्ह्याची कबुली देताना आरोपीने 20 हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी दागिने चोरल्याचे सांगितले. या प्रकरणी राजेंद्र पार्क पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.