'तो' गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर...
शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे मैत्रिणीबाबत नातेवाईकांना काही सांगितल्याचा गैरसमज झाला. यानंतर कोयता हातात घेऊन पाठलाग करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. मनोज साहेबराव भंडारेसह चार अज्ञात युवकांवर खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
वढू बुद्रुक (ता.शिरुर) येथील प्रदीप भंडारे व मनोज भंडारे यांच्यात यापूर्वी प्रदीप याने मनोजच्या मैत्रिणीबाबत तिच्या नातेवाईकांना काहीतरी चुकीचे सांगितले असा गैरसमज मनोजचा झाला होता. त्यामुळे प्रदीप व मनोज यांच्यात यापूर्वी वाद झालेले असताना प्रदीप याने मी तुझ्या मैत्रिणीबाबत कोणालाही काही चुकीचे सांगितले नसल्याबाबतचे मनोजला सांगितले होते. मात्र, त्यानंतर देखील काही दिवसांपूर्वी मी तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी मनोजने प्रदीपला दिली होती. तर सहा जानेवारी रोजी प्रदीप भंडारे हा त्याच्याकडील दुचाकीहून आपटीकडे जात होता.
हेदेखील वाचा : Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा
त्यानंतर अचानक आलेल्या कारमधून आलेल्या मनोजने प्रदीपच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. त्याचवेळी दुचाकीतून मनोजसह चार अनोळखी युवक हातात कोयता घेऊन प्रदीपचा पाठलाग करत शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. मात्र, यावेळी जीवाच्या आकांताने पळालेला प्रदीप गावातील एका घरात लपून बसला आणि याबाबतची माहिती त्याच्या चुलत्यांना देऊन पोलिसांना मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर पुढील अनर्थ टळला.
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
या घडल्या प्रकाराबाबत प्रदीप संभाजी भंडारे (वय २८, रा.वढु बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मनोज साहेबराव भंडारे (रा. वढु बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) याच्यासह चार अनोळखी युवकांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेदेखील वाचा : Solapur Crime: सोनं, कार आणि पैसे…पोलीस पुत्राने शिक्षिकेला 74 लाखांचा चुना लावला; सोलापुरातील धक्कादायक फसवणूक






