गर्भवती महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भवानी वॉर्डमधील एका घरासमोर मंचुरियन स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादातून सहा जणांनी एका गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूजा सचिन लोणारकर (वय २९) असे या महिलेचे नाव आहे. तर राकेश मार्स्कोल्हे, ममता राकेश मार्स्कोल्हे, गोलू मार्स्कोल्हे, रमेशची मेहुणी आणि दोन अनोळखी पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पूजाचा पती सचिन संबंधित आरोपींच्या घरासमोर मंच्युरियनचा स्टॉल लावत होता. आरोपींना त्याला अनेकदा स्टॉल लावण्यास मनाईदेखील केली होती. पण त्याने त्यांचे एकदाही ऐकले नाही आणि स्टॉल लावत राहिला. त्यामुळे २७ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सचिन आणि आरोपींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणातून मारहाणही झाली. ही बातमी पूजाला कळताच तीही पतीला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहचली, पुजा तीन महिन्यांची गर्भवती होती. पण आरोपींना तिच्या पोटावर लाथा-बुक्यांनी मारहाण केल्यामुळे तिच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाला.
आरोपींनी आपल्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे वेदना असह्य होत होत्या. त्यामुळे मला ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पूजाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याच आरोपीच्या तक्रारीवरून पूजाचा पती सचिन याच्यावरही मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल खोब्रागडे यांनी सांगितले की, पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे की, मारहाणीमुळे मुलाचा मृत्यू झाला डॉक्टरांच्या अहवालानुसार असे मानले जाते की मुलाचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नाही तर आधीच रक्तस्त्राव झाल्यामुळे झाला. त्यामुळे मुलाच्या मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याऐवजी, आरोपीविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. चौकशीनंतरच सत्य समोर येईल.