सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा : गोडोली येथील गौरव रेसिडेन्सी मध्ये घरफोडी करून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका परिसरात पाठलाग करून पकडले आहे. पोलिसांनी पाळत ठेवून अवघ्या महिन्याभरात हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. राजकुमार उर्फ राजू ओमकार आपचे (वय ३०, रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) व हर्षद सत्तार बागवान (वय ३२, रा. शनिवार पेठ, कच्छी स्टार बिल्डिंग, सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी गौरव रेसिडेन्सी, गोडोली येथे बंद घराचे कुलूप तोडून दोघांनी दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलीस संशयितांचा शोध घेत होते. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात संशयितांवर पाळत ठेवली होती. संशयित उमरगा तालुक्यातील आपल्या नातेवाईकाकडे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती, त्यानुसार पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला होता. दरम्यान शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
हे सुद्धा वाचा : माळेगावात तरुणावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्याचं कारणही आलं समोर
तीन दिवासांची पोलीस कोठडी
ओंकार आपचे हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर २५ घरफोड्या केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या चौकशीमध्ये साताऱ्यातील बागवान हर्षद याचे नाव पुढे आले असून, त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून चोरीचा पुण्यातील पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे करीत आहेत.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुधीर मोरे, अशोक सावंगी, निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, मोहन नाचन, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, अमोल निकम, मच्छिंद्र माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, सुशांत कदम ,तुषार भोसले, यांनी तपासात सहभाग घेतला होता.
नवी पेठेतील बंगला फोडला
नवी पेठेत चोरट्यांनी बंगला फोडून चोरट्यांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर सुधाकर देशमुख (वय ४६, रा. आनंद बंगला, लक्ष्मीकृपा सोसायटी, नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देशमुख कुटुंबीय मंगळवारी रात्री बाणेर येथील नातेवाईकांकडे गेले होते. ते राहण्यास नवी पेठेतील रामबाग कॉलनीत आहेत. बुधवारी सकाळी देशमुख कुटुंबीय नातेवाईकांकडून परतले. तेव्हा दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ४ लाख ८६ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक खाडे करत आहेत.