संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : रेशनिंगचे धान्य तसेच अंगणवाडीतील बालके, गर्भवती व स्तनदा मातांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणारा पोषण आहार काळ्या बाजारात वळविणाऱ्या रॅकेटप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी कारवाई करत कलीम उर्फ छोटू कुरेशी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीचे धागेदोरे राज्याबाहेरपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेत ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. टोळीप्रमुख कलीम उर्फ छोटू कुरेशी आणि शेख अजहर शेख चाँद कुरेशी, शेख समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुत्तारी, फरदीन गणी पठाण आणि आवेज कुरेशी यांच्यावर मोक्का लावला आहे.
बालकांचा तांदूळ परराज्यात विकला
शहर व ग्रामीण भागातून गोळा करण्यात आलेला रेशनचा तांदूळ वाळूज येथील एका राईस प्रोसेसिंग युनिटमध्ये नेला जात असल्याचे उघड झाले. हा तांदूळ रेशनचा असल्याचे ओळखू येऊ नये म्हणून तो गरम पाण्याने धुऊन त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण खुणा नष्ट केल्या जात होत्या. त्यानंतर आकर्षक पॅकिंगमध्ये भरून गुजरातमधील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील गरीब नागरिक व बालकांच्या हक्काचा तांदूळ परराज्यात विकला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी मोक्का लागू करण्याचा निर्णय घेतला.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, उपायुक्त (परिमंडळ-२) रत्नाकर नवले, सहायक आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत आणि सहायक आयुक्त (सिडको) मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजानन कल्याणकर, निरीक्षक गणेश ताठे, निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
पुणे शहरातील वारजे व उत्तमनगर पोलीस ठाण्यांत १५ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने कर्जबाजारीपणातून झटपट पैसे कमावण्यासाठी पिस्तूल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र मध्य प्रदेशातून आणलेली तीन पिस्तुले विकण्यापूर्वीच भोसरीतील गावजत्रा मैदानात गुंडा विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. शब्बीर उर्फ मलीक जहाँगीर शेख (वय ३८, रा. कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यासह मध्य प्रदेशातील कथित शस्त्रपुरवठादार पप्पी सिंग याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल शुभम कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.






