संग्रहित फोटो
पुणे : रामवाडीत येथील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकारी तरुणीवर धारधार हत्याराने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्थिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही या कंपनीत अंकाऊटिंग विभागात काम करत होते. शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय ३०, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर) याला अटक केली. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीच्या बहिणीने तक्रार दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी मुळ चिपळून येथील आहे. ती कुटूंबियासोबत साताऱ्यात स्थाईक झाली होती. तर आरोपी कृष्णा हा मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. तो गेल्या दहा वर्षांपासून पुण्यातच आहे. त्यामुळे त्याला मराठी व्यवस्थित बोलता येते.
दरम्यान, दोघेही डब्ल्युएनएस या कॉल सेंटर असलेल्या कंपनीत काम करत होते. दरम्यान, त्यांच्यात काही पैशांची देवाण-घेवाण झाली होती. त्यावरून त्यांच्यात वादावाद देखील होते. तरुणीकडून कृष्णा पैसे मागत होता. मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास तरुणी काम संपवून पार्किंगमध्ये आली. ती तिच्या वाहनाने जाणार असतानाच तेथे थांबलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने थेट भाजी कापण्याच्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येरवडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. पोलीस उपायुक्त हिमत जाधव व अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच आरोपी कृष्णा याला ताब्यात घेतले. त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
साडे चार लाखांचा व्यवहार
दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. तरुणी घरात मोठी होती. तिला एक लहान बहिण आहे. कृष्णा याच्या घरात त्याला मोठे तीन भाऊ आहेत. तो लहान आहे. दरम्यान, कृष्णा याने तरुणीला साडे चार लाख रुपये हात उसने म्हणून दिले होते. तरुणीने ते काही कौटुंबिक अडचणीमुळे लागत असल्याचे सांगितले होते. कृष्णा तिला पैसे परत मागत होता. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली होती.