पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील शासनमान्य १११ प्राध्यापक पदांच्या भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, तसेच निवड प्रक्रियेतील गुणांचे स्वरूप स्पष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली व त्यांना लेखी निवेदन सादर केले.
विद्यार्थी संघर्ष कृती समितीने सांगितले की, राज्यातील विद्यापीठांमधील १११ शासनमान्य प्राध्यापक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, याबाबत दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी जावक क्र. एटी १५३९ क्रमांकाचे परिपत्रक प्रभारी कुलसचिवांनी प्रसिद्ध केले होते.
या परिपत्रकानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अजूनपर्यंत निवड प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे निकष मुलाखत गुण, शैक्षणिक पात्रतेचे गुणांकन आणि एकूण गुणांचे प्रमाण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. अगोदर ८०-२०, त्यानंतर ७५-२५ तर सध्या ६०-४० असा गुण वाटपाचा फॉर्म्युला लागू होणार असल्याच्या चर्चेमुळे उमेदवारांमध्ये गोंधळाची परिस्थिती असल्याचे समितीने स्पष्ट केले. यावेळी समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल ससाणे, विद्यापीठ युनिट अध्यक्ष अभिषेक शेलकर, तसेच अभिजित जाधव, अरुण जाधव, बसवराज सोनकांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : पहिल्या राष्ट्रीय खेळाडू मंचाचे आयोजन! भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून करण्यात आली घोषणा
प्राध्यापक पदभरती पारदर्शक होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. गुणांचे स्वरूपाचा गोंधळ भयानक आहे. अगोदर ८०-२० , नंतर ७५-२५ आणि आता ६०-४० अशा स्वरूपाची चर्चा आहे. जोपर्यंत स्वरूप निश्चित होत नाही. परिपत्रक येत नाही. तोपर्यंत भरती प्रक्रिया होऊ देणार नाही. कारण अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ व भ्रष्टाचार झाला आहे. तशीच परिस्थिती विद्यापीठात होताना दिसत आहे. -राहुल ससाणे अध्यक्ष – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र राज्य






