संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (६ नोव्हेंबर) दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दत्तनगर, चिंचवड येथे घडली आहे.
छैया पातरे, करण दोढे (विद्यानगर, चिंचवड) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय देवप्पा हेळवाळ (१७, दत्तनगर, चिंचवड) असे जखमी अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास टाटा शोरुमसमोर, दत्तनगर कमानीजवळ सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी आपल्या मित्रासह मोपेडवरून जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याला रस्त्यात अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने त्याच्या पायावर आणि कमरेवर वार केला. त्यानंतर विद्यानगर येथेही आरोपींनी सीमेंटच्या गट्ट्याने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला
पिंपरी शहरातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात शनिवारी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणीवर चॉपरने वार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यात मुलीचा प्रियकरही आहे. ही घटना हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात तरुणीच्या हाताला, तोंडाला आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे. हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपासात हल्ल्याचे कारण ‘प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद’ असल्याचे स्पष्ट केले आहे.






