संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरट्यांनी आता थेट पालखी सोहळ्यातील भाविकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या दोन भाविकांचे मोबाईल चोरट्यांनी गर्दीतून पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी (२२ जून) प्रस्थान झाले. पुणे-सोलापूर रोडवर रविवारी सकाळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तेव्हा शिवम कमलेश पांडे (वय २६, रा. सुयोग अपार्टमेंट, औंध) हे भैरोबा नाला परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास दर्शनास आले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेताना चोरट्यांनी त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाइल लांबविला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस हवालदार गाढवे तपास करत आहेत.
हडपसर गाडीतळ येथे दुसरी घटना घडली असून, सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे दर्शन घेताना नितीन साळुंखे (वय ४२, रा. घोटवडे, ता. मुळशी) यांच्या खिशातून ९ हजारांचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. याबाबत साळुंखे यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार गव्हाणे तपास करत आहेत.
पालखी सोहळ्यात दोन महिलांचे दागिने लांबविल्याच्याही घटना घडल्या आहेत. पालखी सोहळ्यातील चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. तरीही गर्दीत चोरट्यांनी भाविकांकडील मोबाइल, दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात घरफोडीच्या घटना सुरूच; ‘या’ भागातील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लांबविला