गुन्हेगारांमध्ये धाक नाही उरला ! तिकीट चेकरच्या मानेवर चाकू ठेवून दिली गेली धमकी
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानकाच्या पूर्व भागात प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील तात्पुरत्या तिकीट काऊंटरजवळ तिकीट तपासणी अधिकाऱ्याच्या मानेवर चाकू ठेवून धमकी दिल्याची घटना घडली.
तिकीट तपासणी अधिकारी टी. सी. मिश्रा हे बुकिंग कार्यालयाजवळ कर्तव्यावर होते. ते गर्दी नियंत्रणाचे काम करतात. ‘रेल वन’ अॅपचा प्रचार करत होते. दुचाकीवरून (एमएच-४५ एसी-२८८४) ओरडत वेगाने दुचाकी चालवू लागला. मिश्रा यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता संबंधित तरुण एटीएमच्या मागील बाजूने दुचाकी नेऊ लागला. मिश्रा यांनी चालान जारी करण्यास सुरुवात केली. त्यावर तरुण जवळ आला, वाद घालू लागला आणि शिवीगाळ केली. मिश्रा काही प्रतिक्रिया देण्याआधीच तरुणाने चाकू काढून मानेवर ठेवत चालान काढल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, मिश्रा यांनी धाडस दाखवत ‘मारायचे असेल तर मारून टाका’ असे ठणकावून सांगितले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा आणण्याचा गंभीर प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर मिश्रा हे सहकाऱ्यांसह तातडीने रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाले. मात्र, ‘लेखी तक्रार द्या, चौकशी करून आवश्यक असल्यास एफआयआर नोंदवू,’ असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बातमी लिहेपर्यंत कोणताही एफआयआर दाखल केलेला नव्हता. या घटनेनंतर सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस (एमआरकेएस) संघटनेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर तीव्र चिंता व्यक्त केली असून, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
ट्रेनमधून उतरताना प्राध्यापकावर हल्ला
मुंबई येथील मालाड स्टेंशनवर क्षुल्लक कारणावरून चार दिवसांपूर्वी प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी ओंकार शिंदे याला अटक करण्यात आली. ट्रेनमधून उतरताना ओंकार शिंदे याने धारदार शस्त्राने भोसकून जीव घेतला. यात मृत्यू झालेल्या प्रवाशी प्राध्यापकाचा नाव अलोक सिंग असे आहे. आता या प्रकरणातील आरोपीने हत्येमागचे कारण सांगितले आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: महिलांसमोर ढकललं, अपमान झाला, मालाड स्टेशनवरील प्राध्यापक हत्येमागचं कारण आरोपीने उघड केलं






