मालेगावी तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून (संग्रहित फोटो)
कराड : राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत एका कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांच्या टोळीने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या साथीदारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. राहुल दिनकर शिंगाडे (वय २८, रा. शिंगणापूर, ता. माण) असे याप्रकरणी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोल्हापूर येथील कासार गल्लीतील कृष्णा कुरिअरकडून काही सोन्याचा ऐवज मुंबईला पाठविला जाणार होता. कंपनीतील कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हे मंगळवारी रात्री एका बॅगमध्ये तो ऐवज घेवून महामंडळाच्या कोल्हापूर ते मुंबई स्लिपर कोच बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले. बस कोल्हापूर-सातारा लेनवरून मुंबईकडे निघालेली असताना मध्यरात्री एकच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीतील श्रावणी हॉटेलजवळ थांबली. त्याठिकाणी बसमधील सर्व प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरले.
कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हेही सोन्याचा ऐवज असलेली बॅग सोबत घेऊन लघुशंकेसाठी उतरले. त्यानंतर ते परत बसमध्ये चढले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडे असलेली सोन्याच्या ऐवजाची बॅग हिसकावून चोरटे तेथून पसार झाले. चोरट्यांनी लांबवलेल्या बॅगमध्ये सुमारे ६५ ते ७० लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेले वीस डबे होते.
घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी राहुल शिंगाडे या संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. चौकशीत पोलिसांना त्याच्याकडून त्याच्या अन्य साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
लग्न मंडपाच्या कामाच्या पैशांची चोरी
मालकाची लग्नमंडपाच्या कामाची रोख रक्कम चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १५ लाख ६ हजार किंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सलमान यासीन पठाण (३२, रा. ईसा हाईट्स, शिळफाटा, मुळ रा. पाली, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार दाऊद सय्यद, अमंलदार शाहिद शेख व प्रदिप बेडीस्कर व त्यांच्या पथकाने केली आहे.