संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : पुणे शहरातील घरफोड्यांपुढे पुणे पोलिसांची हतबलता लोटांगण घेऊ लागली असून, चोरटे पुढे अन् पोलिस मागे असेच काही चित्र गेल्या काही वर्षांपासून असल्याचे पाहिला मिळत आहे. कोट्यवधी रुपयांवर चोरटे डल्ला मारत असताना पोलिसांचे हात रिकामेच असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील किरकोळ स्वरूपातच आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात या घटना सलग घडत असून, पुन्हा एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. ज्यात लाखो रुपयांवर डल्ला मारला गेला आहे. त्यामुळे पुणेकर भयभित आहेत.
पुणे शहरातील स्ट्रीट क्राईमचा आलेख वाढत आहे. शहरात सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत असलेल्या घरफोडी, वाहन चोरी तसेच लुटमार, मोबाईल स्नॅचिंग तसेच प्रवासातील चोऱ्या व किरकोळ चोरीच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांमुळे पुणेकर भयभित आहेत. पोलिसांना दरवर्षी दाखल होणाऱ्या गुन्ह्यात निम्मेही गुन्हे उघडकीस आणण्यात यश येत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे चोरटे पुढे आणि पोलिस मागे असाच काहीसा प्रकार गेल्या काही वर्षात दिसत आहे.
गुरूवारी देखील दिवसभरात विविध भागात घरफोडी झाल्याच्या घटनांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाल्या आहेत. या सर्व घटना २५ ते २६ जून दरम्यान घडलेल्या असून, सर्व घटनांतील चोरटे अज्ञात आहेत. एकाही चोरट्याचा माग काढता आलेला नाही. वारंवार घडणाऱ्या या घटनांवर ‘फोकस’ देणे पुणे पोलिसांना गरजेचे झाले आहे. शासनाने कोट्यवधी रुपये बसवून शहरभर सीसीटीव्ही लावलेले असताना तसेच त्यात चोरटे कैद झालेले असताना पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे.
सहा घटनांची नोंद
नानापेठ, धायरी, लोहगाव, चंदननगर, फुरसूंगी व गंगाधाम चौकात चोरीच्या घटना घडल्या आहेत. नाना पेठेतील ज्येष्ठ नागरिक महिलेचा बंद फ्लॅट फोडून ४ लाख ५७ हजारांचा ऐेवज चोरला आहे. तर धायरीत कुटूंबिय घरात झोपलेले होते. तरी देखील चोरट्यांनी पत्रा कापून त्यांच्या घरातून २ मोबाइल चोरून नेले. तसेच, लोहगावात डिफेन्स कॉलनीत बांधकाम साइटवरून १ लाख रुपये किंमतीचे पॉलीकॅब इलेक्ट्रिक वायरचे बॉक्स चोरून नेले आहेत. चंदननगरमधील सोमनाथनगर येथे ७४ वर्षीय महिलेचा बंद फ्लॅट फोडत २ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. फुरसुंगीत गोकुळ बंगल्यात चोरट्यांनी गॅलरीतून प्रवेश केला. तसेच, कपाटातून ४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. गंगाधाम चौकाजवळील गोदावरी अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
नागरिकांमध्ये भीती, पोलिसांची गस्त अपुरी?
गुन्हे शाखाही अपयशी
घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येते. त्याबरोबरच गुन्हे शाखेलाही हे गुन्हे उघडकीस आणण्यास सपशेल अपयश येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा टक्का मोठ्या प्रमाणावर घटला आहे.