संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्याच्या मध्यभागातील मंगळवार पेठसह आंबेगाव पठार तसेच मांजरी खुर्द येथील बंद फ्लॅट फोडत ४ लाखांचा ऐवज लांबविला आहे. सातत्याने शहरात बंद घरे फोडली जात असताना देखील या टोळ्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. परिणामी पुणेकरांच्या पुंजीवर चोरटे दररोज डल्ला मारू लागले आहेत.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात कुणाल सरोदे (वय २९) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार मंगळवार पेठेत राहण्यास आहेत. ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील ७५ हजार ८०० रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला.
दुसरी घटना आंबेगाव पठार येथील स्वामीसमर्थ मठाजवळ घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत किरण रंगदळ (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला व घरातील दागिने व रोकड असा १ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला.
तिसऱ्या घटनेत वाघोली परिसरात एका कुटूंबाला तत्काळ रुग्णालयात जाण्याची वेळ आल्याने त्यांनी घराला कुलूप लावले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून आतमधील दागिने व रोकड असा १ लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांत ३० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.