सौजन्य - सोेशल मिडीया
पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकातच एका पादचारी महिलेचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हिंगणे खुर्द परिसरात राहण्यास आहेत. त्या काही कामानिमित्त येथे आलेल्या होत्या. रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास त्या जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकातून निघाल्या होत्या. तेव्हा पाठिमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी तक्रारदार यांच्याजवळ येऊन त्यांच्या हातातील २५ हजार रुपयांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. महिलेने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर महिलेचा मोबाइल हिसकावल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. तत्पुर्वी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत. शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. पादचाऱ्यांचे मोबाइल तसेच रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.