'आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला...'; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
वर्धा : ‘आमच्याविरुद्धची केस वापस घे, अन्यथा तुला जीवानिशी ठार करू’, अशी धमकी देत घरी येऊन साहित्यांची तोडफोड करणे तसेच फिर्यादीच्या आईलाही शिवीगाळ करण्यात आली. आरोपी इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी ‘जामिनासाठी आम्हाला 50 हजार रुपये लागेल. ते तू दे’ असे म्हणत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करून फायनान्स एजन्टवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना वर्ध्यातील वैशाली विहाराजवळ सावंगी मेघे येथे घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला.
तन्मय भगत (रा. समतानगर) असे फिर्यादीचे नाव आहे. आयुष वावरे, आकाश उर्फ डुड्डू पुसदेकर, गौरव कैतवास आणि सौरव यादव उर्फ लाल्या अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. फायनान्स एजन्ट तन्मय भगत हा तन्मय फायनान्शिअल सर्व्हिस नावाने लोन एजन्सी चालवितो. काही महिन्यांपूर्वी त्याचा आकाश पुसदेकर याच्यासोबत वाद झाला होता. त्यावेळी आकाश, आयुष, कोहिनूर उके यांनी चाकूने वार करून तन्मयला जखमी केले. शहर पोलिसांनी तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण मागे घेण्यासाठी आयुष व आकाश हे तन्मयवर दबाव आणत होते. मात्र, तन्मयने प्रकरण मागे घेतले नाही.
दरम्यान, 16 जुलै रोजी आयुष, आकाश, फरदीन सैयद आणि यश देवगडे यांनी रात्री 10 वाजता हातात हत्यार घेऊन तन्मयचे घर गाठले. तन्मयवर हल्ला करून घरातील सामानांची तोडफोड केली. शिवाय तन्मयच्या आईला शिवीगाळ केली. आरोपींनी कारची तोडफोडही केली. ही दोन्ही प्रकरणे मागे घेण्यासाठी चौघेही तन्मयवर दबाव आणत होते. अशातच जामिनासाठी 50 हजारांची खंडणीही वसूल करण्याचा प्रयत्न झाला होता.
चौघांनीही फोडली कारची काच
तन्मय हा पहाटे साडेचारच्या सुमारास अल्पोहारासाठी कारने वर्धा मेन रोडवरील महाराष्ट्र बँकेजवळ जाण्यास निघाला. वर्धा-देवळी रोडवर येताच दोन दुचाकीने आयुष, आकाश, गौरव, सौरव यादव उर्फ लाल्या असे चौघे सावंगीकडे जात असल्याचे दिसले. तन्मयला भीती वाटल्याने त्याने कार वळवली. चौघांनीही पाठलाग करत त्याच्या कारची काच फोडली. मात्र, जिवाच्या आकांताने तन्मयने कार सावंगी पोलिस ठाण्यापर्यंत नेली. पोलिसांच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेतली.