फोटो सौजन्य - Social Media
वसई, रवींद्र माने: नालासोपारामध्ये गुरुवारी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सीएमएस कंपनीच्या व्हॅनमधून साडेतीन कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-३ च्या पथकाने ही मोठी कारवाई केली. नालासोपारा पश्चिम एसटी स्टँड रोडवर एमएच ४३, बी एक्स ५६४३ क्रमांकाची व्हॅन संशयास्पद स्थितीत फिरताना आढळली होती. पोलिसांनी तिची तपासणी करण्यास सुरुवात केली. या तपासणीत व्हॅनमध्ये दोन इसम सापडले. तसेच एक चालक होता. हे दोन इसम आणि चालक साडेतीन कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड घेऊन जात असल्याचे आढळले. त्यामुळे या तिघांनाही नालासोपारा पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. सध्या ते दोन इसम आणि चालक अटकेत आहेत.
हे देखील वाचा : प्लस गोल्डचे ‘मीरा ज्वेलरी’ कलेक्शन लाँच ! ग्राहकांना अलंकारसोबतच मिळणार नवी सुविधा
सीएमएस ही कंपनी कॅश मॅनेजमेंट आणि एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करते. गोरेगाव येथून सुरु झालेली ही व्हॅन विरार येथे पोहोचणार होती, असे व्हॅनमधील व्यक्तींनी पोलिसांना सांगितले. परंतु, तपासणीमध्ये व्हॅनमधील व्यक्तींना फक्त ५४ लाख रुपयांचा हिशोब असल्याचे आढळून आले, तर उर्वरित रक्कम विषयी कोणताही ठोस तपशील त्यांच्या कडे नव्हता. या संपूर्ण व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या निवडणुकीच्या वातावरणामुळे पोलिसांकडून या रकमेचा उपयोग कोणत्याही राजकीय कारणासाठी होत नाही ना, याबद्दलही शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा मुद्दा राज्यात एक चर्चेचा विषय बनला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यावर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक, माजी सभापती अतुल साळुंखे यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तातडीने हजेरी लावली. तसेच माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तातडीने हजेरी लावली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या रकमेची विनातपशील वाहतूक का करण्यात आली, यावर शंका व्यक्त करत उमेश नाईक यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
हे देखील वाचा : Profectus Capital ला IFC कडून 25 दशलक्ष डॉलर्सची बूस्ट! भारताच्या हवामान ध्येयांना मिळणार प्रोत्साहन
या प्रकरणात अद्याप पोलीस विभागाकडून कोणताही ठोस खुलासा करण्यात आलेला नाही. पोलिसांनी व्हॅनमधील रक्कमेचा तपशील आणि त्याच्यामागे असलेले संभाव्य कारण तपासण्यासाठी सखोल चौकशी सुरु केली आहे. या मागचे कारण शोधण्यात पोलीस प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा होता आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरु आहे.
ही घटना निवडणुकीच्या वातावरणात घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा निर्माण झाली आहे. अशी रोकड वाहतूक निवडणुकीच्या वेळी कुठल्या कारणासाठी होत असावी, यावर राजकीय वर्तुळातही तर्क वितर्क लावले जात आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये या घटनेने फार मोठ्या चर्चेला उधाण आणले आहे.