देवदर्शनाला जाताना काळाचा घाला (संग्रहित फोटो)
नागपूर : सिहोर येथील कुबेरेश्वर धामच्या दर्शनासाठी जात असलेल्या नागपूरमधील भाविकांच्या कारला मुलताईजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील भागावर आदळल्याने नागपूरच्या तिघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले. शनिवारी पहाटे बैतूल-नागपूर महामार्गावर हा अपघात घडला.
मृतांमध्ये बुटीबोरी येथील दीपक श्यामराव राऊत (वय ५५), पत्नी छाया दीपक राऊत (वय ५१) आणि प्रभा रामकृष्ण करदाते (वय ४८) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये नीता (वय ४०), नैतिक (वय १२), उज्ज्वला मोहन (वय ५२), संगीता (वय ४३) आणि सौरभ (वय ३०) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक राऊत आणि कुटुंबीय तसेच शेजारी कार (क्रमांक एमएच-४९ मधून सी-४७५६) सिहोर येथील कुबेरेश्वर धामच्या दर्शनासाठी निघाले होते. मुलताईजवळ कार चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारचे पुढील चाक तुटून वेगळे झाले, तर छताचेही मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच मुलताई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.
जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरात हलवले. या भीषण अपघातामुळे राऊत आणि करदाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खड्डा ठरला काळाचा घाला
बालेवाडी-महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. ट्यूशनला जात असताना वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात होते. दुचाकी घसरल्यानंतर ११ वर्षीय ऋषभ पाटोळे हा मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेला हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Balewadi Mahalunge Accident News : खड्डा ठरला काळाचा घाला! ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू






