रांजणगावमध्ये अपघात (फोटो -istockphoto )
रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे १४ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या अपघातांत एक महिला व एक ज्येष्ठ नागरिक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील खंडाळे माथा येथील मातोश्री हॉटेल समोर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या कटमुळे झालेल्या अपघातात मारुती लक्ष्मण ताम्हाणे (वय ६९, रा. खराडी, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
मागील सीटवर बसलेले पोपट पर्वती ताम्हाणे ( वय ६२ ) जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला. या प्रकरणी भा.न्या.सं. कलम 106(1), 281, 125(a)(b) तसेच मोटार वाहनकायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पासलकर तपास करत आहेत.
त्याच दिवशी रात्री साडे आठ वाजता गणेगाव-रांजणगाव रोडवर मस्के बिल्डिंगसमोर शतपावलीसाठी निघालेल्या राधा सुरेश बागल (65, रा. संकल्प सिटी, रांजणगाव) यांना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी चालक वाहनासह पळून गेला. या प्रकरणी सुनील बागल यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चव्हाण तपास करत आहेत.
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात
राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या भीषण घडना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात एक विचीत्र अपघात घडला आहे. मैत्रिणीला घेऊन दुचाकीने निघालेल्या तरुणाला पाठिमागून आलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. यामध्ये तो तरुण आणि त्याची मैत्रिण खाली कोसळले. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तो तरुण सापडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवम आणि त्याची मैत्रीण कोरेगाव पार्क भागातून मंगळवारी ( १२ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने शिवमच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर शिवमचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यात पडला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने शिवमला धडक दिली. शिवम टेम्पोच्या चाकाखाली सापडला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघातात त्याची मैत्रीण जखमी झाली. या अपघातानंतर शिवम आणि त्याच्या मैत्रिणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान शिवमचा मृत्यू झाला. वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या टेम्पोचालकासह दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ अधिक तपास करत आहेत.