संग्रहित फोटो
सिडको : राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाटा परिसरात भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील भाविक इनोव्हा कार (क्रमांक एमएच ०५ सीव्ही १००१) मधून अजमेर शरीफ येथे दर्शन घेऊन नाशिककडे परतत होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर जोरदार आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात बबलू रफिक सय्यद (३०, रा. वडाळा गाव) आणि नवाज सादिक शेख (रा. सिडको) यांचा मृत्यू झाला. तसेच साबीर शेख (वय १६), साहिल शेख (वय २६), मोहसीन शेख (वय ३२), अईन शेख (वय २२) आणि कैफ शेख (वय २२) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांपैकी नवाज सादिक शेख हे सिडको परिसरातील फिरदोस कॉलनी येथील रहिवासी होते. विशेष म्हणजे, त्यांचा अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिडको परिसरात शोककळा पसरली आहे.
बलूच सय्यद यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा
बबलू रफिक सय्यद हे वडाळा गाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून वडाळा गाव परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, वाहनाचा वेग, चालकाची अवस्था आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे. अजमेर शरीफ येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने नाशिकमधील त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.






