संग्रहित फोटो
पुणे : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार तसेच स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून महिला विषयक गुन्ह्यांबाबत विशेष खबरदारी घेतली जात असून, वानवडी पोलिसांनी विनयभंगाच्या एका गुन्ह्यात जलदगतीने तपास करून न्यायालयात २४ तासात दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे, आरोपीला तातडीने अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. ही घटना २ मार्च २०२५ रोजी रात्री १०:०० ते १०:३० च्या सुमारास घडली होती. पीडित महिला आपल्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेर असताना आरोपी राहुल संजय मिरेकर (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) याने काहीही कारण नसताना तिला अडवले. त्याने पीडितेसोबत अश्लील वर्तन करत शिवीगाळ केली आणि दमदाटी करून विनयभंग केला. यामुळे पीडित महिला घाबरली होती, मात्र तिने धैर्य दाखवत पोलिसांकडे धाव घेतली.
पीडितेच्या तक्रारीनंतर १७ मार्च २०२५ रोजी दुपारी ४:३१ वाजता वानवडी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ७८(२), ७९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास केला. काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन त्याला त्याच दिवशी रात्री ८:३३ वाजता अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. १८ मार्च २०२५ रोजी अवघ्या २४ तासांत लष्कर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने ते स्वीकारत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव आणि त्यांच्या पथकाने अतिशय तत्परतेने पूर्ण केला. पोलिसांनी आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची भीती न बाळगता त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग सतर्क असून, अशा गुन्ह्यांत कठोर कारवाई केली जाईल, असे म्हंटले आहे.