अकलूजच्या गणेशगावमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोकं, तोंडासह पायावरही धारदार हत्याराने केले वार (फोटो सौजन्य-X)
शिरपूर जैन : खंडाळा शिंदे येथे प्रेमात अडसर ठरलेल्या पतीची गळा दाबून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी महिला व तिच्या प्रियकराला शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना मालेगाव न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. श्रीकृष्ण शिंदे असे मृताचे तर शारदा श्रीकृष्ण शिंदे व हनुमान पांडुरंग श्रीखंडे अशी आरोपींची नावे आहेत.
शिरपूर पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. 5) भागवत पांडुरंग शिंदे (रा. खंडाळा शिंदे) यांनी माहिती दिली की, त्यांचा भाऊ श्रीकृष्ण यांचा झोपेत मृत्यू झाला. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगावला पाठवला. तसेच भाऊ भागवत यांचा तोंडी रिपोर्ट घेण्यात आला. त्यानुसार, श्रीकृष्ण बुधवारी (दि. 4) रात्री 11 वाजता त्याच्या घरात झोपला असता सकाळी उठलाच नाही. त्यामुळे त्याची वहिनी शारदाने सकाळी 7 वाजता घरी येऊन तो उठत नसल्याचे सांगितले. तेव्हा तेथे जाऊन भावाला उठविण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही. त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
शनिवारी (दि. 7) शवविच्छेदनाचा अहवाल शिरपूर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात श्रीकृष्ण यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सरकारी पक्षातर्फे पोलिस उपनिरीक्षक इमरान पठाण यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून प्रारंभी शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
शारदा हिचे होते हनुमानशी प्रेमसंबंध
सखोल तपास केल्यानंतर मृताची पत्नी शारदा हिचे प्रेमसंबंध हनुमान पांडुरंग श्रीखंडे याच्यासोबत असल्याची माहिती मिळाली. त्यादृष्टीने गुन्ह्याचा तपास करण्यात आला. त्यानंतर हनुमानची कसून चौकशी केली असता त्याने शारदासोबत त्याचे प्रेमसंबंध असून तिचा पती प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याचे सांगितले. अशात बुधवारी श्रीकृष्ण त्याच्या घरी झोपला असताना गळा दाबून त्याला जीवे ठार मारल्याचे सांगितले.
सबळ पुरावे गोळा करणे सुरू
या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार केशव वाघ, पोलिस उपनिरीक्षक इमरान पठाण, संदीप निखाडे, संगीता मानकर, हरीहर गावंडे, नीलेश जायभाये, अंकुश चव्हाण यांनी विशेष कामगिरी केली. या खुनातील इतर आरोपी निष्पन्न करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले जात आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार केशव वाघ करीत आहे.