धक्कादायक ! मित्राला लोकेशन पाठवून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन (File Photo : Suicide)
गारगोटी : मित्राला मोबाईलवर लोकेशन पाठवून एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. साहील साताप्पा जाधव (वय १९, सध्या रा. खडकेवाडा, ता. कागल, मूळ रा. वाघापूर, ता. भुदरगड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. साहील जाधव याने कळंबा परिसरात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी (दि.3) सकाळी निदर्शनास आला.
साहील हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करत होता. हाताशी आलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने जाधव कुटुंबीयांना धक्का बसला. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील जाधव हा आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून नुकताच गोकुळ शिरगाव येथील एका कंपनीत नोकरी करत होता. वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. आई आणि लहान भावासह तो खडकेवाडा येथे राहत होता. रविवारी सकाळी तो मित्राच्या दुचाकीवरून कामाला निघाला होता. मात्र, कळंबा येथे तो दुचाकीवरून उतरला. थोड्या वेळाने येतो, असे सांगून त्याने मित्राला पुढे पाठवले.
वाघापूर येथील एका मित्राच्या मोबाईलवर स्वतःचे लोकेशन पाठवून तो उसाच्या शेतातून एका आंब्याच्या झाडाजवळ गेला. दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी न आल्याने नातेवाईक आणि मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा मित्राच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध लागला. नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
आत्महत्येच्या घटनेने नातेवाईकांना बसला धक्का
इतर नातेवाईक वाघापूर येथे असतात. अचानक घडलेल्या घटनेने नातेवाइकांना धक्का बसला असून, पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पुण्यातही आत्महत्येची घटना
राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.