दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना अटक (संग्रहित फोटो)
गोंदिया : रात्री गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांच्या पथकाने अंधारात शस्त्रांसह लपून बसलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिर्ची पूड आणि शस्त्रांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई कुंभारेनगरातील आंबेडकर भवनानजीक करण्यात आली.
गोदिया शहर पोलिस रात्री शहर परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना कुंभारेनगर गोंदिया येथील आंबेडकर भवनच्या इमारतीच्या डाव्या बाजूला अंधारात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्याकडे धारदार शस्त्र बाळगून ते कुठेतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र बसले असल्याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने पथकाने त्या ठिकाणी जावून मध्यरात्री छापा टाकला.
तेथे घनश्याम ऊर्फ गोलु अशोक चौधरी (२२, रा. माताटोली), मित्तल मुनेश्वर तुपटे (२०, रा. पैकनटोली) यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तर उर्वरित व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या तरूणांची अंगझडती घेतली असता घनश्याम ऊर्फ गोलू अशोक चौधरी याच्या ताब्यातून एक नग धारदार लोखंडी तलवार व पांढऱ्या रंगाची मळकट रंगाची दोरी, तर मित्तल मुनेश्वर तुपटे याच्या ताब्यातून एक नग धारदार लोखंडी कोयता, एक नग लोखंडी रॉड, एक काळया रंगाचा पोको कंपनीचा मोबाईल तसेच घटनास्थळावरुन सुमारे १०० ग्रॅम मिरची पावडर व एक टॉर्च असा एकूण ६७४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, अटक करण्यात आलेले तरूण प्राणघातक शस्त्रांसह कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीनिशी एकत्र आढळले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, पोलिस उपनिरीक्षक घाडगे यांच्या पथकाने केली आहे.