Air Quality in Delhi : राजधानी दिल्लीत प्रदूषण पुन्हा वाढतंय; प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी शहरातील अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘गंभीर’ आणि ‘खराब’ या श्रेणींमध्ये नोंदवली गेली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) माहितीनुसार, आनंद विहारमधील AQI ४३० वर पोहोचला, जो ‘गंभीर’ श्रेणीत येतो. अक्षरधाम परिसरात AQI ४२६ नोंदवला गेला. अशोक विहार (३०६) आणि बवाना (३०९) येथील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली. जहांगीरपुरीमध्ये AQI ३१८ आणि द्वारका सेक्टर ८ मध्ये AQI ३४१ नोंदवला गेला. तर चांदणी चौकात AQI २९१, आयजीआय विमानतळ २८८, तर बारापुल्ला उड्डाणपुलावर २९० आणि आयटीओ २८४ नोंदवले गेले, जे सर्व ‘खराब’ श्रेणीत येतात.
हेदेखील वाचा : Air Quality in Delhi : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; ‘या’ वाहनांवर 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत बंदी
वाढत्या प्रदूषण पातळीला रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक भागात मिस्ट स्प्रिंकलर बसवण्यात आले आहेत. दरम्यान, इंडिया गेटभोवती मिस्ट स्प्रिंकलर बसवण्यात आले आहेत. असे असूनही, इंडिया गेट परिसरात २६९ AQI नोंदवण्यात आला, जो ‘खराब’ श्रेणीत राहिला आहे.
व्यावसायिक वाहनांवर बंदी
राजधानी दिल्लीत प्रदूषण वाढताना दिसत आहे. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एक नोव्हेंबरपासून राजधानीत प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ‘एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन’ने (CAQM) शुक्रवारी हा निर्णय घेतला. सर्व सीमा बिंदूंवर कडक देखरेखीचे आदेश दिले जेणेकरून कोणतेही वाहन नियमांचे उल्लंघन करणार नाही याची खात्री करता येईल.