File Photo : Madha Politics
पंढरपूर : संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाला मतदारांची मोठी पसंती असून, या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना रोज अनेक दिग्गज नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.
हेदेखील वाचा : ‘विकास निधीबरोबरच मुश्रीफांनी संजय मंडलिकांचे राजकीय करिअरही चोरलं’; समरजितसिंह घाटगे यांचं टीकास्त्र
माढा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, बबनराव शिंदे यांच्या यांचे पुत्र रणजीत शिंदे यांना प्रचारात पिछाडीवर सोडले आहे. अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अरण येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कोकाटे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संजय कोकाटे यांनी गत पंचवार्षिक निवडणुकी बबनराव शिंदे यांचे प्रमुख विरोधक म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
गेल्या आठ दिवसांपासून अभिजीत पाटील यांना अनेक गटांचा पाठिंबा मिळाला असल्याचे दिसत आहे. निवडणुकांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांना सहकार्य करणाऱ्या अनेक जणांनी यंदा परिवर्तनाचा निर्धार करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच तसेच शेवटपर्यंत प्रयत्न करूनही तुतारी चिन्ह न मिळाल्याने अपक्ष लढण्याची नामुष्की ओढावलेल्या पुत्र रणजीत शिंदे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात असून, यामुळे अभिजीत पाटील यांचा विजय सोप्पा मानला जात आहे.
हेदेखील वाचा : New CJI Sanjeev Khanna: संजीव खन्ना यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ;राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा
सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा
सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हा मतदारसंघ राहिला आहे. लोकसभेला शरद पवारांचा करिश्मा या मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. त्यानंतर आता विधानसभेसाठी या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या मोठी होती. विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत महाविकास आघाडीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, यंदा ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसून त्यांच्या सुपुत्रासाठी म्हणजे रणजित शिंदे यांच्यासाठी ते धावपळ करताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत चांगलं यश
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती. सध्या तेथून ते विद्यमान खासदार आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील 1, 20, 837 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.