Photo Credit- Social Media शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण रंगले आहे. विधानसभेची रणधुमाळी संपली असली तरी जोरदार राजकारण सुरु आहे. महायुतीकडे बहुमतापेक्षा देखील अधिक मताधिक्य व जागा आहेत. मात्र तरी देखील अद्याप महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रिपद व इतर खाते वाटपावरुन चर्चा बाकी राहिल्यामुळे अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. यामध्ये अनेक खात्यांवरुन भाजप व शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडे काही महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
महायुतीने न भूतो न भविष्य़ती असा विजय मिळवला आहे. मात्र पदांचे आणि खात्यांचे वाटप यावरुन सत्तास्थापनेचे घोंगडे भिजत राहिले आहे. मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये जोरदार चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केल्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मात्र ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. मात्र भाजपच्या धक्कातंत्रामुळे ही जबाबदारी नक्की कोण स्वीकारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरुन दावा सोडला असला तरी महत्त्वाच्या खात्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची दिल्लीमध्ये या विषयावर महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यावर आणि नगर विकास खात्याची मागणी केली आहे. मात्र भाजप यावर काय निर्णय घेणार यावर पुढील राजकारण आधारित असणार आहे. दरम्यान महायुतीची राज्यामध्ये होणारी बैठक ती तातडीने रद्द करण्यात आली. यामुळे चर्चांना उधाण देखील आले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शिंदे गट व भाजपच्या या बोलणीमध्ये अजित पवार गटाला कोणती खाती मिळणार याची देखील चर्चा सुरु आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असेच सरकार स्थापन होईल, असे सूचक विधान अजित पवारांनी केले होते. यापूर्वीच्या महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते त्याचप्रमाणे अर्थमंत्री देखील होते. आता पुन्हा नव्याने तयार होणाऱ्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासह अर्थमंत्री पद, महिला आणि बालविकास, अल्प संख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा अशी खाती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंच्या गावी जाण्यामुळे सरकार स्थापनेमध्ये दिरंगाई
महायुतीमध्ये खातेवाटपावरुन राजकारण रंगले आहे. शिंदे गट व भाजपमध्ये अद्याप बोलणी सुरु आहे. काल (दि.28) दिल्लीला वारी करुन तिन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत बोलणी केली. यानंतर आज सागर बंगल्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांची बैठक होणार होती. यामध्ये खातेवाटप व पालकमंत्री अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे गावी गेल्यामुळे ही बैठक रद्द झाली. आता दोन दिवसांनंतर ही बैठक होणार आहे. मात्र यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये विलंब होत आहे.